ठाणे - कल्याण रेल्वे स्थानकातून उत्तरप्रदेशाला जाणाऱ्या मजुरांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आठ तासांत तीन श्रमिक ट्रेन रवाना करण्यात आल्या आहेत.
यामधील पहिली कल्याण ते भदोही (उ. प्र.) ही श्रमिक ट्रेन काल सायंकाळी ४ वाजता रवाना करण्यात आली होती. या श्रमिक ट्रेनमधून १७८८ मजूर रवाना झाले आहेत. त्या पाठोपाठ कल्याण ते जौनपूर (उ.प्र.) ही दुसरी श्रमिक ट्रेन सायंकाळी ६ वाजून १० मिनिटाने रवाना करण्यात आली आहे. या श्रमिक ट्रेन मध्ये १६५० प्रवासी होते. तर तिसरी श्रमिक ट्रेन कल्याण ते गोरखपूरसाठी (उ. प्र.) रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी रवाना झाली. यातून १८५२ प्रवासी माघारी गेले. काल दिवसभरात ५ हजार २९० प्रवाशांना आपापल्या राज्यात सोडण्यात आले आहे. दरम्यान, काल दुपारी उत्तर प्रदेशला जाणारी श्रमिक ट्रेन उशिरा धावल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. मात्र काही वेळातच पोलिसांनी या प्रवाशांची व्यवस्था कल्याण आणि विठ्ठलवाडी बस डेपोत केल्याने संभ्रम कमी झाला.
दुसरीकडे श्रमिक विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेत असलेल्या आणि ज्यांची वैद्यकीय/शारीरिक स्थिती आधीपासूनच बिघडलेली आहे. त्यांना कोविड-१९ साथीच्या आजारात अजून धोका वाढण्याची शक्यता आहे. तसेच आधीपासूनच विविध आजार असलेल्या लोकांच्या मृत्यूच्या काही दुर्दैवी घटना प्रवासा दरम्यान घडल्या आहेत.
दरम्यान, श्रमिक रेल्वेतून प्रवास करताना अनेक ठिकाणी कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात आले. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळावे, असे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच गर्भवती महिला, १० वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनीदेखील प्रवास न करण्याचे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी केले आहे. सांगितले.