ठाणे - ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मागील आठवड्याभरात हळूहळू वाढत आहे. काल बाधितांचे आकडा हा 200 पार झाला. त्यामुळे राज्य सरकारने ठाणे महापालिकेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यात लगेच लॉकडाऊन नाही. प्रशासन सर्व प्रकारच्या उपाययोजना करत असून ऑक्सीजन बेड, औषधे, लसीकरण, या सर्व उपाययोजना प्रशासन पूर्वीसारखेच सुरळीत करत आहे.
वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे प्रशासन चिंतीत झाले आहे. सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न वापरणे, हे प्रकार सुरू झाल्याने आता प्रशासन याबाबत कठोर पावले उचलणार आहे. राज्यभरात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना राज्य शासनाने निर्बंध शिथिल करत मिशन बिगेंन सुरू केले. मात्र नागरिकांनी परिस्थिती योग्य रीतीने हाताळली नाही. हलगर्जीपणा सुरू झाला आणि यामुळे पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढली. लाकडाऊनचा अजूनही विचार केलेला नाही आणि तशी वेळ आली. तर ठाणे महानगरपालिका राज्य सरकारच्या आदेशाने तो देखील उपाय करेल, अशी माहिती ठाणे महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली.
पालिका प्रशासन करणार कठोर कारवाई-
कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विना मास्क रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर आणि सोशल डिस्टन्स न पाळनाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने आता पालिका प्रशासन कठोर कारवाई करणार आहे सार्वजनिक ठिकाण हॉटेल्स लग्नसमारंभ क्लब याठिकाणी नियमांचे कठोर पालन करावे लागणार आहे. शहरातील बाजारपेठा भाजी मार्केट मच्छी मार्केट या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी उपाय योजना आता केल्या जाणार आहेत. त्यासोबत प्रभाग नुसार जनजागृती देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. आता पालिका प्रशासन आधीच्या पेक्षा जास्त सतर्क झाले असून सर्व आवश्यक त्या उपाययोजना पालिका प्रशासनाने करून ठेवल्या आहेत. उपलब्ध असलेल्या साडेतीन हजार ऑक्सिजन बेड पैकी आत्ताच्या घडीला जवळपास 85 टक्के बॅड हे रिकामी आहेत. पालिका प्रशासन सर्व आकडेवारीवर बारीक लक्ष ठेवून आहे. महापालिकेची वॉर्डरूम आणि मुख्य नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. रुग्णवाहिका व्यवस्थापन, वेळ व्यवस्थापन प्रणाली अद्ययावत करण्यात आलेली आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी आज ठाण्यात दिली.
हे प्रभाग हॉटस्पॉट झोनमध्ये-
वर्तक नगर माजिवडा उथळसर नौपाडा या प्रभाग समितीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. आता हे प्रभाग हॉटस्पॉट झाले असून या प्रभावर प्रशासन बारीक लक्ष ठेवणार आहे.
साफसफाई वर भर-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शौचालयांची दिवसातून तीन ते चार वेळा साफसफाई होणार आहे. गर्दीचे ठिकाण मुख्य चौक या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी होऊन साफ-सफाई करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिलेल्या आहेत.
पोलिसांची घेणार मदत-
ठाणे महानगरपालिकेत असणारा 405 आस्थापनांना नोटीस देण्यात आल्या असून शासनाचे नियम मोडणार यांवर कारवाई करण्यात येणार आहेत. ही कारवाई आता खडक होणार असून त्यांच्यावरती या संदर्भामध्ये निर्बंध लादण्यात आलेले आहेत. हॉटेल स्मॉल हॉल लग्न कार्यालय रेस्टॉरंट बार या ठिकाणी पालिकेसोबत पोलिसांची देखील कारवाई होणार आहे. त्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग सुद्धा वाढवलेली आहे.
हेही वाचा- अमरावती, यवतमाळमध्ये सापडलेला कोरोना प्रकार परदेशी नव्हे; देशातीलच विषाणू प्रकारात झालाय बदल