ठाणे - अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या आईची पोटच्या मुलाने प्रेयसीच्या साथीने राहत्या घरात हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील मैत्रीपार्कमधील इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात मुलासह त्याच्या प्रेयसीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. कृष्णा अंबिकाप्रसाद यादव(२९) व प्रेयसी बबिता पलटुराम यादव (३०) अशी अटक आरोपीची नावे आहेत. तर अमरावती अंबिका प्रसाद यादव (५८) असे हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव आहे.
बेल्टन गळा आवळून बेडरूममध्येच हत्या - आरोपी मुलगा कृष्णा हा अविवाहित असून त्याचे याच परिसरात राहणाऱ्या आरोपी बबिता सोबत मागील ३ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याची कुणकुण मृत आईला लागल्याने तिने कृष्णाच्या या अनैतिक संबंधास विरोध करीत होती. त्यामुळे पोटच्या मुलानेच आईच्या हत्येचा कट रचला, त्यानुसार २० सप्टेंबरला मृत आई अमरावती हीला राहत्या बिल्डिंगच्या बेडरूममध्ये नेले, त्यानंतर पहाटेच्या दोन ते अडीच सुमारास प्रेयसी बबिता हिच्याशी आपसात संगनमत करून बेल्टने आईचा गळा आवळून बेडरूममध्येच हत्या केली. दरम्यान मृतक च्या पतीला माहिती मिळताच त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात घटनेची दिली. माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.
१५ तासांच्या चौकशीनंतर हत्येची कबुली - घटनेनंतर संशियत म्हणून पोलिसांनी मुलासह त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेऊन तब्बल १५ तासांच्या चौकशीनंतर त्यांनी हत्येची कबुली पोलिसांना देताच दोघांनाही अटक करून पोलीस कोठडीत डांबण्यात आले. आज दुपारच्या सुमारास दोघांनाही न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी पाटील करीत आहेत.