ठाणे - बदलापुरातील डिलिव्हरी प्रायव्हेट कुरिअर कंपनीच्या गोडाऊनमधील तिजोरी अज्ञात चोरट्यांनी उचलून नेली होती. त्यावेळी या तिजोरीत अडीच लाख रुपये होते. मात्र ही तिजोरी डिजिटल असल्याने त्याचा पासवर्ड या चोरट्यांना माहीत नव्हता. विशेष म्हणजे तिजोरी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांच्या तावडीत सापडले आहे. खळबळजनक बाब म्हणजे या चोरीचा मुख्य सूत्रधार कंपनीत कामाला असलेला डिलिव्हरी बॉयच निघाला आहे. अजय सूर्यवंशी असे अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव असून त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. विशाल मालाकार असे अटक केलेल्या दुसऱ्या चोरट्याचे नाव असून या गुन्ह्यातील आणखी दोघे फरार असून त्यांनाही शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर पोलिसांनी दिली आहे.
मुख्य सूत्रधाराला तिजोरीत लाखो रक्कम असल्याची माहिती
बदलापुरात डिलिव्हरी प्रायव्हेट कुरिअर कंपनी असून या कंपनीच्या गोदामात ४ फेब्रुवारीला चार चोरट्यांनी मिळून तिजोरी लंपास केली होती. मात्र चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. तर या प्रकरणी कंपनी व्यवस्थापकाने बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत, पोलिसांनी मोठ्या शिताफिने कुरिअर कंपनीचा डिलिव्हरी बॉय अजय सूर्यवंशी यालाच अटक केली आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन वस्तूंचे कुरिअर या गोडाऊनमधून केले जायचे. त्याचे लाखो रुपये रोज तिजोरीत जमा व्हायचे. याची माहिती अटक केलेल्या डिलिव्हरीचे काम करणाऱ्या मुख्य आरोपी अजय सूर्यवंशी याला होती.
कंपनीतील कामगारांच्या चौकशीनंतर मुख्य सूत्रधाराला अटक
मुख्य आरोपी याने आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीने ४ फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास शटर फोडून आत प्रवेश करीत तिजोरी लंपास केली होती. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही पडताळून आणि कंपनीतील कामगारांची चौकशी करताना अजयला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी अजय, विशाल मालाकार या दोघांना अटक केली असून चोरीला गेलेली तिजोरीही या चोरट्यांकडून हस्तगत केली आहे, तर इतर साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.