ठाणे - कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी ठाणे महानगरपालिका हद्दीत 2 जुलै सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज पासून पुढील 11 दिवस लॉकडाऊन लागू झाला असून या पार्श्वभूमीवर ठाण्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंदचा नियम पाळला जात आहे.
वागळे इस्टेट, आनंदनगर, कोळीवाडा अशा विविध ठिकाणी पाहणी केली असता लोकांची रोजची गर्दी पहायला मिळाली नाही. पहाटे 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत खुला राहणारा जांभळी नाका भाजी मार्केट आज सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरु राहील, अशा घोषणा पोलिसांनी केल्या.
लॉकडाऊनच्या आजच्या पहिल्या दिवशी भाजी मार्केटमध्ये नागरिकांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे अनेकांनी पोलिसांच्या कारवाईला घाबरून घरातच राहणे पसंत केले.