ठाणे - ठाण्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी पारा १६ अंशावर घसरल्याने ठाण्यात थंडीची हुडहुडी वाढली आहे. त्यामुळे, कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त होत असून या कालावधीत नागरिकांनी शरीराचे तापमान योग्य राखण्याची दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे.
दोन दिवसात वाढला गारटा-
या दोन दिवसात ठाण्यातील तापमानाचा पारा हा चांगलाच खाली आला आहे. साधारणपणे २० अंश सेल्सियस असणारा पारा मंगळवारी (२९ डिसें.) तब्बल १६ अंशापर्यंत खाली आल्याने हुडहुडी भरणारी थंडी जाणवू लागली आहे. गेले दोन दिवस सकाळपासूनच हवेतील गारठा जाणवत होता. सकाळी फिरायला जाणारी मंडळी स्वेटर, कानटोप्यांचा आधार घेताना दिसत आहेत. साधारणत: दिवाळीच्या आधीपासून थंडी सुरू होते. यंदा मात्र थंडी काहीशी लांबली असून पहाटे साडेसहा वाजता किमान तापमान १६ अंशावर आल्याने ठाणेकर या सुखद गारव्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.