ठाणे - पालिका आयुक्तांनी त्वरित खड्डे बुजवण्याचे आदेश दिले असून देखील नागरिकांना काही ठिकाणी खड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. खड्यांमुळे ठाणे शहरासह महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मात्र, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क स्वःत रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याचे काम हातात घेतले.
ठाण्यात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली असून सर्वत्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तीनहात नाका येथे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. महत्वाचा मार्ग असलेल्या तीनहात नाका येथे खड्ड्यामुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. मुंबईहुन घोडबंदर रोड येथे जाण्यासाठी नागरिकांना खड्याचा सामना करावा लागत आहे. तर शहरातील काही रस्त्यांची चाळण झाली असून, शहरांतर्गत वाहतूककोंडी वाढत आहे. या खड्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. खड्डे बुजवण्यात पालिका दुर्लक्ष करत असल्याने अखेर वाहतूक पोलिसांनीच हातात घमेले घेतले. वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवण्याचे काम केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
पावसाळ्यात दरवर्षी तीन हातनाका येथे खड्डे पडत असतात. तर काही ठिकाणी खड्यामुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत. जागोजागी खड्डे पडले असल्याने प्रावशांना धीम्या गतीने वाहने चालवावी लागतात. सर्वाधिक नागरिकांची वर्दळ असलेल्या तीनहात परिसरातील अनेक रस्त्यांची पावसाळ्यात चाळण झाली आहे. त्यामुळे या परिसरातून वाहने बाहेर पडताना खड्ड्यात अडकल्याने वाहतूककोंडी वाढत आहे. एरव्ही वाहतूककोंडी सोडवणाऱ्या पोलिसांच्या हातात घमेले पाहून अनेकांचे डोळे चक्रावले.