ठाणे - सायंकाळी सात नंतर सुरू राहणाऱ्या सर्व आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार सोमवारी शहरातील ७२ आस्थापने सील करण्यात आली आहेत. यापुढेही कारवाई सुरु ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व आस्थापने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. महापालिकेनेही तशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत. तरीही काही आस्थापने सातनंतरही सुरू राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे सायंकाळी सातनंतर जी आस्थापने सुरू असतात, अशा आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कालपासूनच सातनंतर उघड्या राहणाऱ्या आस्थापनांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त रोज सायंकाळी सात ते साडेसात या कालावधीत आपल्या प्रभागामध्ये फिरून सुरू असलेली आस्थापने तसेच अन्नपदार्थाच्या स्टॅाल्सवर कारवाई करत आहे.