ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना आपली दोन बोटे गमवावी लागली. तर त्यांच्या सुरक्षारक्षकांना देखील एक बोट गमवावे लागले आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु आता एक धक्कादायक बाब समोर येत आहे. कल्पिता पिंपळे यांच्यावर ज्या ठिकाणी हल्ला झाला. तेथील स्थानिक दुकानदारांनी पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार देखील केला होता. मात्र या पत्र व्यवहाराला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली. फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर कल्पिता पिंपळे या कारवाई करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. शेजारीच असलेल्या गृहनिर्माण सोसायटीने ही बाब पालिका प्रशासनाच्या आधीच निदर्शनास आणून दिली होती. ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती, तर आज कल्पिता पिंपळे यांना या हल्ल्याला सामोरे जावे लागेल नसते. त्यानंतर पालिका प्रशासनाला उशीरा का होईना जाग आली आणि त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सगळीकडेच अनधिकृत बांधकाम, अनधिकृत फेरीवाले विरोधात धडक कारवाई सुरू केली. ही कारवाई काही दिवसांनी थांबेल त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी फेरीवाले आपले ठाम मांडून बसणार का? आणि त्यांच्यावर पुन्हा कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच हे फेरीवाले पुन्हा याच ठिकाणी ठाण मांडून बसणार अशी भीतीदेखील स्थानिकांनी वर्तवली आहे.
कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर चार दिवसांनी प्रशासनाला जाग आली. आता फेरीवाल्याशी जवळचे संबंध आढळून आल्याने नौपाडा अतिक्रमण पथकातील एका क्लार्कला निलंबित केले आहे. पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केली ही निलंबनाची कारवाई केली आहे. छोटे अधिकारी निलंबित करुन मोठ्या अधिकाऱ्याना वाचवले जात आहे का? असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जातो.
'...म्हणून कारवाई नाही'
ठाण्यात सर्वच प्रभाग समित्यामध्ये चिरीमिरी घेऊन अशा प्रकारे अवैध फेरीवाल्याना अभय दिले जाते. त्यांच्यामुळे नुकसान मात्र कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना होतो. फेरीवाला धोरण राबवले जात नाही का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - वसईच्या 'त्या' संशयीत बोटीची अखेर पटली ओळख ; 26 तासानंतर खलाशाची सुटका