ठाणे - ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 15 हजार 500 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिली.
महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनससंदर्भात आज महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महापौर नरेश म्हस्के यांची उपस्थिती होती. या बैठकीत कर्मचाऱ्यांना 15 हजार 500 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.
कर्मचाऱ्यांच्या बोनसवर 16 कोटींचा खर्च
या निर्णयामुळे महापालिका आस्थापनेवरील 7 हजार 91 कर्मचारी, एकत्रित मानधनावरील 262 कर्मचारी, शिक्षण विभागातील 1 हजार 47 कर्मचारी तर, परिवहन विभागात कार्यरत असलेल्या 1 हजार 850 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. तर, कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी महापालिकेला 16 कोटींचा खर्च येणार आहे. हे अनुदार कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. महापालिका आर्थिक अडचणीत असतानाही बोनस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.