ठाणे - लोकसभेच्या उमेदवारांना आचारसंहितेचे पालन आणि प्रचार अशी तारेवरची कसरत करावी लागते. ठाण्याचे लोकसभेचे सेनेचे उमेदवार राजन विचारे यांचा जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात सुरू असलेल्या नवरात्रौत्सवाचा प्रचार सुरू आहे. लेझर लाईटचा वापर करून इमारतीवर आयोजक म्हणून त्यांच्या नावाचा प्रचार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
निवडणूक आचारसंहितेमुळे लोकसभेचे सेनेचे उमेदवार राजन विचारे यांना उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही. तसेच स्वतःच्या नावाचे बॅनर्स किंवा कटआऊट्सही लावता येत नाही.
नवरात्रौत्सवाचे यजमान आहेत राजन विचारे-
आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यात आनंद चॅरीटेबल ट्रस्टच्या नावाने विचारे यांनी चैत्र नवरात्रौत्सव सुरू केला. या नवरात्रौत्सवाचे यजमान खुद्द राजन विचारे आहेत. तसेच कार्यक्रमाचे आयोजक विचारे आहेत, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी लेझर लाईटचा वापर केला आहे. शिवाजी मैदानाच्या उजव्या बाजूच्या इमारतीवर रात्रीच्यावेळी ही लेझरलाईट १५ ते २० मिनीटांच्या फरकाने सुरू असते. लेजर लाईट ५ मिनिटे दिसल्यानंतर पुन्हा बंद होते. प्रचाराची ही अनोखी पद्धत पाहून ठाणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.