ठाणे - मोठ्या प्रकल्पांमुळे ठाणे पालिकेची तिजोरी रिक्त होण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. त्यात पालिकेचा अर्थसंकल्प मार्च उजाडल्यानंतरही अद्याप सादर न झाल्याने पालिका तिजोरीला आर्थिक ग्रहण लागल्याचे चित्र आहे. पालिका कर्मचाऱ्यांचा महिन्याच्या एक किंवा दोन तारखेला होणारा पगार हा आता ५ मार्चला झाला आहे. तर, निधी नसल्याने अनेक नगरसेवकांची प्रभागातील कामे रेंगाळली असल्याचे चित्र आहे.
पालिका आयुक्तांनी पदभार सोडल्याने आता अतिरिक्त आयुक्त - १ राजेंद्र अहीरवर हे ११ मार्चला अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे पालिका ३ हजार कोटी रुपयांच्या कर्जात आहे. शहरात मोठ्या रक्कमेचे अनेक प्रकल्प सुरू असल्याने पालिकेला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. हे मोठे प्रकल्प परवडणारे नसून सुटा बुटातील प्रकल्प लादल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होईल व त्यामुळे कदाचित पालिका कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची पंचाईत होईल, असे पत्र भाजप नगरसेवकाने दिले होते, ते खरे ठरले.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा एक किंवा दोन तारखेला होणारा पगार हा ५ मार्चला झाला आहे. तर, दुसरीकडे अनेक नगरसेवकांच्या विकासकामांच्या फायली तयार आहेत. मात्र, ती कामे करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून निधी मिळत नसल्याने प्रलंबित पडली आहेत.
अर्थसंकल्प 11 मार्चला -
दरम्यान, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आता ११ मार्च रोजी सादर करणायचा मुहूर्त सापडला आहे. अर्थसंकल्प हा प्रथम स्थायी समितीला आणि नंतर महासभेत मंजुरी घेण्यात येणार आहे. याला किमान महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ठाणे पालिकेचा यंदाचा दरवाढीचा अर्थसंकल्प असल्याचे चित्र दिसत आहे. ठाण्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प आणि थकबाकी, वसुली विक्रमी झाल्यानंतरही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी करवाढ अपेक्षित आहे. पाण्याच्या शुल्कात आणि परिवहनच्या भाड्यात वाढीची शक्यता यंदाच्या अर्थसंकल्पात आहे. या सोबतच विविध विभागात करवाढ होणार आहे. मुंबई शहरात ५०० फुटांच्या घराला मालमत्ता कर माफ करण्यात आले. मात्र, निवडणुकीच्या आश्वासनाची अंमलबजावणी तीन वर्ष लोटल्यानंतरही ठाणे पालिका परिसरात करण्यात आलेली नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करमाफी मिळणार का? याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -
इराणमध्ये आज भारतीय वैद्यकीय पथक पहिले आरोग्यकेंद्र उभारेल, परराष्ट्रमंत्र्यांची माहिती..
महा'अर्थ': सर्वाधिक जीडीपी असलेल्या महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक