ठाणे - सचिन वाझे प्रकरणानंतर पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याऐवजी ती आणखीनच मलीन होताना दिसत आहे. ठाण्यातील उमरा परिसरातील पोलिसांनी अवैध रित्या घरात घुसून 6 कोटी रुपये घेतल्याच्या प्रकरणात मुंब्रा पोलीस ठाण्याच्या तीन अधिकाऱ्यांसह 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि एसीपी यांची चौकशी करण्याचे आदेश देखील पोलिस उपायुक्तांनी दिले आहेत.
पोलिसांनी सहा बॉक्स ठेवले - ठाण्यातील मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागात राहणारे खेळण्यांचे व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिक फैजल मेमन यांच्या घरी ३० वेगवेगळ्या बॉक्समध्ये प्रत्येकी एक कोटी प्रमाणे ३० कोटी दडवून ठेवल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना १२ एप्रिल रोजी रात्री १२. ३० च्या सुमारास मिळाली. या माहितीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे, मदने यांच्यासह तीन साक्षीदारांना घेत मेमन यांच्या घरी धाड टाकली. याठिकाणी तब्बल ३० खेळण्यांच्या बॉक्समध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये पोलिसांना आढळून आले. हे पैसे घेऊन मेमनसह पोलिसांचे पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात आले. याठिकाणी हा काळा पैसा आहे, त्यातील अर्धी रक्कम आम्हाला दे, अशी मेमन यांना पोलिसांनी दमदाटी केल्याचे तक्रारदार इब्राहिम शेख यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना दिलेल्या अर्जात नमूद केले होते.
सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी - मेमन यांनी पोलिसांना दोन कोटी देण्याचे कबूल केले. मात्र पोलिसांनी सहा बॉक्स स्वतःकडे ठेवून घेतले. यामध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये होते. पोलिसांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या केबिनमध्ये हे सहा कोटी रुपये मोजून ठेवले. पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा प्रकार उघडकीस येईल, असा दावा अर्जदार इब्राहिम शेख याने केला होता. याबाबत राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, ठाण्याचे सहपोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त व कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनाही शेख यांनी अर्जाची प्रत रवाना केली होती. याच प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३ अधिकारी आणि ७ कर्मचारी ठाणे पोलिसांनी निलंबित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची खात्यांतर्गत चौकशी होणार आहे. तसेच सर्व निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त करणार असून ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी तसे आदेश दिले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याने वरिष्ठांनी याबाबत बोलणं देखील टाळलं आहे.
स्टेशन डायरी मुळे झाली निलंबनाची कारवाई - या प्रकरणाची चौकशी सुरू असताना पोलिसांनी पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्याशिवाय पोलीस ठाण्याची स्टेशन डायरी देखील तपासली असता त्यात डायरीमध्ये यासंदर्भात मधील चौकशी करण्यासाठी जात असल्याची नोंद देखील आढळली आणि या नोंदी मुळेच या दहा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे.