ठाणे - कोविड सेंटरमधून कामावरून काढलेल्या नर्ससाठी आंदोलन करत असताना मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे महानगरपालिकेच्या समोर अचानक पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली. त्यानंतरही आंदोलन सुरू असताना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले.
अचानक झालेल्या या दोन्ही पोलिसांच्या कृतीमुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, त्यांना शांततेचे आवाहन केल्यावर हा विषय निवळला.
ठाणे पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये अविनाश जाधव यांच्यावर ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगडमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्यांना तडीपारीची नोटीस देण्यात येत असल्याचे लिहिण्यात आले आहे. आतापर्यंत आंदोलन आणि त्याबाबतीच्या अनेक डझन केसेस अविनाश जाधव यांच्यावर आहेत. या आंदोलनामुळे आता त्यांना ठाणे पोलिसांनी अचानक नोटीस बजावली आहे.
एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष
अविनाश जाधव यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत एक कार्यकर्ता म्हणून झाली. हळूहळू मराठी भाषा आणि रेल्वे भरती आंदोलनामुळे अविनाश जाधव यांचे नाव समोर आले.
पुढे तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याशी एक कोटी रुपयांचा जामीन बॉण्ड प्रकरण गाजले, तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेऊन अविनाश जाधव यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. मात्र, त्यानंतरही नागरिकांसाठीची आंदोलने सुरूच होती. आता कोरोनाच्या काळात अनेक रुग्ण, अन्यायग्रस्त, गरजूंना मदत करण्याचे काम त्यांनी सुरू ठेवले आहे. त्यामुळे आपल्यावरील पोलिसांची कारवाई ही राजकीय असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.