ठाणे - उल्हासनगर शहरात भटक्या श्वानांची नसबंदी करून त्यांच्या संख्येवर आळा घालणारी यंत्रणा नसल्याने शहरात श्वानांची संख्या वाढली आहे. शहरातील सुभाष टेकडी परिसरात भटक्या श्वानांची एका दिवसांत १५ जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. ज्यामध्ये लहान मुलांचा अधिक समावेश आहे.
हेही वाचा - औषध देण्यास नकार दिल्याच्या वादातून नशेखोरांकडून मेडिकलची तोडफोड; घटना सीसीटीव्हीत कैद
भटक्या श्वानांच्या संख्येत लक्षणीय वाढ
शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास सुभाष टेकडी नालंदा शाळेजवळील रस्त्यावर मोकाट कुत्री टोळीने फिरली. कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना रस्त्यावरून जाणेही कठीण झाले आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यात सिद्दी पठारे, विराज रुपवते, परंजल सूर्य कांबळे, मदन डमके, विशाल म्हस्के, वाल्मिक वाघ, हर्षीत भाटी आणि अहरव सावंत अशी जखमी झालेल्या लहान मुलांची नावे असून, १५ नागरिकांना कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून त्याच्यासाठी कोणतीही व्यवस्था केली जात नाही. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
कोविडमुळे नसबंदी नाही, पालिकेचे सांगणे..
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने पादचारी, नागरिक आणि विशेषत: लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्यांच्या वाढत्या झुंडीवर नियंत्रण ठेवण्यात महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. शहरातील अनेक भागांतून रात्रीच्या वेळी ये-जा करणे नागरिकांना अवघड झाले आहे. मात्र, भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नसताना त्यांची नसबंदी मोहीम कोविडचे कारण सांगत बंद असल्याचे उल्हासनगर पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.