ठाणे - ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि नगरसेवक यांच्यामध्ये आता वाद निर्माण झाला आहे. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आपला अपमान केला असल्याने आज स्थायी समितीची बैठक तहकूब करून आयुक्त शर्मा यांची तक्रार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी सांगितले. दरम्यान, आयुक्त आणि नगरसेवकांमधला वाद भविष्यात विकोपाला जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा - Gangster Suresh Pujari : कुख्यात गुंड सुरेश पुजारीला 25 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ठाणे महापालिका आयुक्तांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी केला. स्थायी समितीकडून मंजूर प्रस्तावांचेही कार्यादेश आयुक्तांकडून रोखले जात असल्याचा दावा भोईर यांनी यावेळी केला असून, याप्रकरणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त करून स्थायी समितीची बैठक तहकूब केली. स्थायी समिती सभापतींना प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या वागणुकीचा सर्वपक्षीय नगरसेवकांनी निषेध करून प्रशासनाचा निषेध केला.
गेल्या काही वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यामध्ये अनेक वेळा वाद होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, चक्क पालिका आयुक्त नगरसेवकांचे ऐकत नाही, ठाणे पालिकेत प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी केला.
स्थायी समिती सभापतीचा अपमान केल्यामुळे त्वरित स्थायी समितीची बैठक तहकूब करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी यावेळी केली. येत्या काही दिवसांत अधिकरीविरुद्ध नगरसेवक यांच्यातील हा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.
आतापर्यंतचा सर्वात मोठा अपमान
आजपर्यंत जेवढे आयुक्त आले त्यामध्ये मिळून कामे केली आहेत. आम्ही कोणतीही विकासकामे घेऊन गेलो की, नकारात्मक विचार आयुक्त करतात. मी स्थायी समिती सभापती म्हणून काम घेऊन गेलो असता माझा अपमान झाला. माझ्या कारकिर्दीत हा पहिला अपमान असून, आमचे वरिष्ठ नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे स्थायी समिती सभापती भोईर यांनी सांगितले.
हेही वाचा - School Reopen in Thane : ठाणे जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीच्या ९८७ शाळांची घंटा वाजणार