ठाणे - मोक्का न लावण्यासाठी करोडो रुपयांची खंडणी प्रकरणात (Extortion Case) परमबीर सिंग (Param Bir Singh) यांची चौकशी सुरू आहे. अशातच आता सोनू जालान (Sonu Jalan) हे या खंडणी प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी (SIT) टीमची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. हा खंडणीचा गुन्हा दाखल होऊनही 60 दिवसात चार्जशीट फाईल न झाल्याने 29 पैकी 2 आरोपींना जामीन मंजूर झाला आहे त्यामुळे इतरही आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यात वॉन्टेड असलेले पोलीस आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशीही केली नसल्याचा आरोप सोनू यांनी केला आहे. आता या सर्व विषयांविरोधात पोलीस महासंचालकांकडे चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे सोनू जालान यांनी सांगितले.
सोनू जालान यांनी केले गंभीर आरोप -
साडेतीन कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी आज परमबीर सिंग यांची ठाणे नगर पोलीस स्थानकात चौकशी सुरू आहे. चौकशीतून काय निष्पन्न होईल ते पुढे कळेलच. परंतु, आपण या चौकशीवर नाराज असल्याचे तक्रारदार सोनू जालान यांनी सांगितले. परमबीर सिंग खंडणीखोर असून त्यांनी तब्बल साडे तीन कोटींची खंडणी वसूल केली, असा आरोपही जालान यांनी केला. कुख्यात डॉन रवी पुजारी हादेखील परमबीर सिंग यांचा साथीदार असून, या सर्वांनी मिळूनच हे खंडणी सत्र सुरू केले होते, असा खळबळजनक आरोप सोनू जालान यांनी केला. या तपासात पोलिसांची भूमिका अत्यंत संशयास्पद असून, आपण नेमलेले सरकारी वकील प्रदीप घरत यांना देखील पोलीस कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या या नाकर्तेपणामुळेच दोन आरोपींना जामीन झाला व इतरांच्याही जामिनाचा मार्ग मोकळा झाला, असा खळबळजनक आरोप सोनू जालान यांनी केला.
त्यावेळचे सहकारी करत आहेत चौकशी-
आज परमबीर सिंग यांची चौकशी करत असलेले उपायुक्त अविनाश अंबुरे हे परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यासोबतच काम करत होते आणि आता ते परमबीर सिंग यांची चौकशी करत आहेत. त्यामुळे ही चौकशी निष्पक्षपणे होईल का असा प्रश्न सोनू जालान यांनी उपस्थित केला आहे.