ठाणे - वन विभागाने कल्याणमधील फ्लॅटमध्ये चालणाऱ्या दवाखान्यातील वन्यजीवांच्या ऑनलाईन खरेदी-विक्रीचा पर्दाफाश झाला आहे. वनविभाग आणि वन्यजीव अपराध ब्युरोने दवाखान्यात अचानक धाड टाकली. यावेळी वनाधिकारींनी काळ्या जादूसाठी वापरण्यात येणाऱ्या 250 इंद्रजाल आणि 50 हातजोड्या हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी त्रिकुटाला अटक करण्यात आले आहे.
अटकेमध्ये गीता आनंद जाखोटिया (47) या कथित डॉक्टरचा समावेश आहे. तिचा पुरवठादार नवनाथ त्रंबक घुगे (30) आणि अक्षय मनोहर देशमुख (22, रा. म्हारळ) यांनाही वनविभागाने अटक केली आहे.
हायप्रोफाईल इमारतीमधून काळी जादूच्या वस्तूचा व्यवसाय-
वनविभाग आणि वन्यजीव अपराध ब्युरोच्या नवी मुंबईतील बेलापूर शाखेने कल्याण पश्चिमेकडील मॅक्सि ग्राऊंडजवळ असलेल्या नवएव्हरेट टॉवरच्या सी विंगमधल्या 102/103 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये धाड टाकली. शुभ संकेत वास्तू नावाने कार्यालय थाटलेल्या या दवाखान्यामधून या तिघांना अटक केली. ही कारवाई वन्यजीव अपराध ब्युरो अर्थात डब्ल्यूसीसीबी रेजीनलचे उपसंचालक योगेश वरकड, ठाण्याचे उपवन संरक्षक गजेंद्र हिरे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. कल्याण विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आर. एन. चन्ने यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकणाऱ्या संघाचे नेतृत्व मानद वन्यजीव वॉर्डन आणि डब्ल्यूसीसीबी स्वयंसेवक सुनीश सुब्रमण्यम कुंजू यांनी केले.
हेही वाचा-पठ्ठ्याने श्वानासाठी बुक केला Air India चा पूर्ण बिझनेस क्लास; मुंबई ते चेन्नई प्रवास!
वन्यप्राणी आणि त्यांच्या अवशेषांची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान
वन्यजीव तस्करीची काळी छाया आजही अनेक अंधश्रद्धाळूंवर कायम आहे. काळी जादू, शौक आणि औषधी वापरासाठी होणाऱ्या या वन्यप्राणी आणि त्यांच्या अवशेषांची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान वन विभाग, निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींसमोरही आहे. जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वन्यजीव तस्करीची पाळेमुळे ठाणे जिल्ह्यात पसरणे ही गंभीर बाब आहे. या संयुक्त कारवाईसाठी वन आणि डब्ल्यूसीसीबी टीमचे सप्पन मोहन, विजय नंदेश्वर, गोल अधिकारी आर. शेलार, दिलीप भोईर, वन रक्षक रोहित भोई, वाय. पी. रिंगणे, विनायक विशे, कार्यालय सहाय्यक जयेश घुगे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
हेही वाचा-चांगल्या पॅरेंटिंगसाठी 'या' टिप्स ठरू शकतात फायदेशीर
त्रिकुटाकडून 250 इंद्रजाल आणि 50 हाथाजोडी (हातजोड्या) असा गौण वनोपज जप्त करण्यात आले. ही वन्यसंपत्ती वन्यजीव अधिनियम 1972 नुसार परिशिष्ट 1 मध्ये संरक्षित प्रजातीमध्ये असून तिची विक्री व अवैधरित्या जवळ बाळगणे बेकायदेशीर आहे. तिन्ही तस्करांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2 (16), 9, 39, 51, 52 आणि 48 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-जिद्द अन् प्रखर आत्मविश्वासाने आई-वडिलांचे नाव केले 'रोशन'.. दिव्यांग असतानाही झाली एमडी डॉक्टर
आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
हातजोडी आणि काळ्या रंगाची ही जाळी अर्थात इंद्रजाल हे सौभाग्य, संपत्ती, समृद्धीसाठी वापरले जात असल्याचे समजते. तसेच त्यापासून आयुर्वेदिक औषधेही बनवली जातात. आयुर्वेदिक दुकाने, तसेच वास्तू पूजन आणि इतर पूजांसाठी लागणाऱ्या वस्तू विक्रीच्या दुकानांमध्ये इंद्रजाल आणि हातजोडी विक्रीसाठी ठेवली जाते. या वस्तू जवळ बाळगणे आणि त्यांची खरेदी-विक्री करणे बेकायदेशीर आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे वॉर्डन सुनीश सुब्रमण्यम कुंजू यांनी सांगितले. तर अटक केलेल्या 3 जणांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या तिघांना 19 सप्टेंबरपर्यंत अर्थात 2 दिवसांची वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आर. एन. चन्ने यांनी सांगितले.
वास्तू आणि महावस्तू सल्लागार म्हणून आरोपीची ओळख
धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी गीता आनंद जाखोटिया ही व्यवसायाने डॉक्टर असल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे. कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोडला नव एव्हरेस्ट टॉवरमध्ये पहिला मजल्यावर तिचे शुभ संकेत वास्तू नावाने दवाखाना आहे. तर मुंबईतील ग्रँट रोडला खेतवाडी लेन 12 येथेही शाखा आहे. वास्तू आणि महावस्तू सल्लागार म्हणून स्वतःची ओळख सांगणाऱ्या या कथित डॉक्टरने महावस्तू साहित्याची पुरवठादार असल्याचे पॅम्प्लेट छापून वितरित केले. वन अधिकाऱ्यांनी छाप्या दरम्यान हे टेम्प्लेट जप्त केली आहेत.
वन्यजीवांच्या अवयवांचे मोठे घबाड लागले हाती ..
सुगंधी तेल, सुगंधी मेणबत्त्या, अंकशास्त्र, क्रिस्टल थेरपी, रेकी हीलिंग, टॅरो कार्ड्स, डाऊझिंग मास्टर, उपचार तज्ञ वास्तू साहित्य आणि रत्न पुरवठादार असल्याची जाहिरातबाजी करणाऱ्या या महिलेने एम एस्सी, पीएचडीची पदवीही स्वतःच्या नावामागे लावल्याचे पॅम्प्लेटमध्ये नमूद केले आहे. कल्याणमधील याच दवाखान्यावर वनविभागाने कारवाई केली. त्यानंतर या महिलेला इंद्रजाल आणि हातजोड्यांचा पुरवठा करणाऱ्या नवनाथ घुगे आणि अक्षय देशमुख या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर वनविभागाच्या हाती वन्यजीवांच्या अवयवांचे मोठे घबाड हाती लागले. यात आणखी एकाचा समावेश असून ती व्यक्ती लवकरच जाळ्यात येईल, असा विश्वास सुनीश कुंजू यांनी व्यक्त केला.