ठाणे - अनधिकृत बांधकामाप्रश्नी भाजपच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी शिवसेना महापौरांसह शिवसेनेला टीकेचे लक्ष करत उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. या राजीनामा नाट्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. युवासेना सहसचिव जयेश वाणी यांनी भाजपच्या नगरसेविका उपेक्षा भोईर याच अनधिकृत घरात राहत असल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - ठाण्यात संतप्त प्रियकराचा विवाहित प्रेयसीच्या आईवर तलवारीने हल्ला
युवासेना सहसचिव जयेश वाणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मागील आठ ते दहा वर्षात मोठ्या प्रमाणात टिटवाळ्यात अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. पालिकेचे उपमहापौर आणि मागील १० वर्षापासून नगरसेवक असलेल्या उपेक्षा भोईर यांनी या अनधिकृत बांधकामांविरोधात खूप कमी तक्रारी प्रशासनाकडे केल्या होत्या. किंबहुना उपमहापौर राहत असलेले घर देखील अनधिकृत असून शिवसैनिक नरेश पाटील यांच्या जागेवर हे घर दादागिरी करून उभारण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत वाणी यांनी केला.
सोमवारी झालेल्या महासभेनंतर उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी शिवसेना अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालत असल्याचा आरोप पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्यानंतर शिवसेना भाजपमध्ये जुंपल्याचे दिसून येत असून युवासेना सहसचिव वाणी यांनी शिवसैनिक नरेश पाटील यांच्या समवेत पत्रकार परिषद घेत उपमहापौर यांच्यावर आरोप केले आहेत. टिटवाळा शहरात मागील 10 वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम झाल्यामुळे शहर भकास झाले असताना उपमहापौर म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत या बांधकामाबाबत भोईर यांनी किती तक्रारी केल्या, उलट ही सर्व अनधिकृत बांधकामे त्यांच्याच आशीर्वादाने उभी राहिल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, नरेश पाटील यांनी ८ वर्षापूर्वी आपण खरेदी केलेल्या जागेवर दादागिरी करून उपमहापौरांनी घर बांधले आहे. तरीही प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तर, त्यांचे कार्यालय देखील रस्ता रुंदीकरणात बाधा आणत असल्याचे सांगत अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत त्यांचे पद रद्द करण्याची कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालिका आयुक्ताची भेट घेणार असल्याचे वाणी यांनी सांगितले.