ठाणे - निवडणूक आयोगाने मतदानाची आदर्श नियमावली घोषित करूनही सर्रास त्याची पायमल्ली होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. एका मतदाराने चक्क मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना कल्याण ग्रामीण मतदारसंघात उघडकीस आल्याची माहिती मिळत आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेना मनसेमध्ये मुख्य लढत आहे. मात्र, दुपारच्या सुमारास शिवसेनेकडून मतदान करतानाचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आखलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार केंद्रामध्ये मोबाईल आदी वस्तुंना घेऊन जाण्यास मज्जाव निवडणूक आयोगाने केला होता. मात्र, तरी देखील नियम धाब्यावर बसवून अनेकांनी व्हिडिओ व्हायरल केले होते.
या प्रकरणी निडणूक आयोगाने त्यांच्यावर कठोर कारवाई देखील केली होती. मात्र, आता पुन्हा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हे व्हिडिओ व्हायरल केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अश्या नेटकऱ्यांवर कठोर कारवाई निवडणूक आयोग करणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.