ठाणे : राज्यात सत्तासंघर्ष ( Political Struggle in Maharashtra ) सुरू असून, शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Group Against Shiv Sena ) गट असा सामना रंगला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ( Thane Guardian Minister Eknath Shinde ) यांनी सर्व आमदारांना एकत्रित करीत बंडखोरी केली आहे. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी राज्यभर शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. रविवारी संध्याकाळी खासदार संजय राऊत यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. या घटनेमुळे ठाण्यात शिंदे समर्थक हे शिवसेना विरोधात आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे.
शिंदे समर्थक आक्रमक : तीन हात नाका येथे शिवसेना खासदर संजय राऊत यांचा पुतळा जाळण्यात आला. राऊत यांनी बंडखोर आमदारांविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे समर्थक ठाण्यात चांगलेच आक्रमक झाले असून, राऊत यांचा पुतळा जाळून एकनाथ शिंदे समर्थकांनी निषेध व्यक्त केला. दरम्यान, गेली ६ दिवस शांत असलेले ठाण्यातील शिंदे समर्थक यांनी शिवसेनेच्या विरोधात उघड भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.
मातोश्री बिथरली : ठाण्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रविवारी शिवसेनेच्या मुखपत्रात म्हस्के यांची हकालपट्टी केल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. यावर म्हस्के यांनी सेना नेतृत्व म्हणजे हे वराती मागून घोडे, अशा प्रकारचे ट्विट करून टिका केली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शवणार्यांवर कारवाई सुरू केल्याने मातोश्री बिथरल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. तर मातोश्रीकडूनदेखील ठाण्यात शिंदेच्या विरोधात टीम उभी करण्याची चाचपणी केली असून, अनेकांना भेटीसाठी बोलवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.