ठाणे - ईडीच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. हा केवळ माझा एकट्याचा प्रश्न नसून विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी 'ईडी'सारख्या यंत्रणांचा वापर करण्यात येत असून ईडीच्या या प्रेमप्रकरणांनंतर लोकांचा प्रतिसाद वाढला असून यावेळी परिवर्तन होणार, असा विश्वास शरद पवार यांनी ठाण्यात व्यक्त केला आहे. राजकारणात कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार असून मतदार मात्र त्यांचा योग्य अधिकार बजावतील, असा टोला देखील पवारांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या गयारामांना लगावला आहे.
हेही वाचा - एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागत - छगन भुजबळ
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. ज्यावेळी सत्ताधारी पक्ष म्हणून लोकांपुढे जाण्यासाठी काहीही मुद्दे नसतात तेव्हा असे धार्मिक मुद्दे उपस्थित करून भावनिक आवाहन सत्ताधाऱ्यांकडून केले जात असल्याचे पवार म्हणाले. काश्मीर आणि राम मंदिराचा मुद्दा हा विधानसभेच्या निवडणुकीचे मुद्दे असू शकत नाही. हे मुद्दे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळचे असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - ठाकरे कुटुंबाने मराठी माणसाला काय दिले- अॅड. सुरेश माने
राज्यात बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मात्र, त्यावर हे सरकार बोलायला तयार नसल्याचेही पवार म्हणाले. सत्तेचा गैरवावर करून ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांचा गैरवापर केला जात असून हे आशा प्रकारे भूमिका घेणे योग्य नसल्याचे पवार म्हणाले. यात ईडीला मी दोष देणार नाही, ईडीला ज्या 'वरून' सूचना आल्या होत्या त्याचे त्यांनी पालन केले. यामागे कोणाचा दबाव आहे हे देखील पाहावे लागेल, असे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन
अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना पवार कुटुंबीय कोणत्याही प्रकारे हवालदिल नव्हते, असे सांगून माझ्यावरील लावण्यात आलेल्या आरोपांमुळे ते भावूक झाले होते. मात्र, हा फक्त त्यांच्यापुरता प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गयारामांना मतदार धडा शिकवतील -
राजकारणात कोणी कुठे जायचे हे त्या त्या लोकांना अधिकार असतो. मात्र, मतदार फार सुज्ञ असतात, ते त्यांचा अधिकार योग्य पद्धतीने बजावतील असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
भाजपचे लोक संपर्कात-
भाजपने मंत्री विनोद तावडे, एकनाथ खडसे, तसेच बावनकुळे, नवी मुंबईचे विजय नाहटा यांना अजूनही तिकीट मिळाले नसल्याचा मुद्दा प्रसारमाध्यमांनी विचारल्यानंतर हे सर्व त्या त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश नाईक यांनी सन्मान गमावला-
भाजपमध्ये योग्य सन्मान मिळणार नाही हे माहीत असताना ते भाजपमध्ये गेले .त्यामुळे त्यांना आता हे सर्व भोगावेच लागेल, असा टोला देखील पवार यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे
महाराष्ट्रात परिवर्तनाचा मूड -
महाराष्ट्रातील 80 % तरुण मतदारांना बदल हवा आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथे केलेल्या दौऱ्यात महाराष्ट्रात परिवर्तनाचा मूड असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.