ठाणे - शाळेच्या पाचव्या मजल्यावरून 14 वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील नागाव सलामतपुरा परिसरात असलेल्या अन्सारी साफिया गर्ल्स हायस्कूल मध्ये घडली आहे. मुबाशिरा बानो नुरुद्दीन शेख असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती दहावीच्या वर्गात शिकत होती. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
भिवंडी शहरातील नागावात सलामतपुरा परिसरात अन्सारी साफिया गर्ल्स हायस्कूल आहे. या शाळेमध्ये मृत मुबाशिरा ही आज बुधवारी पहिल्या मजल्यावरील तिच्या वर्गात घटक चाचणीची परीक्षा देत होती. परीक्षा संपल्यावर मुबाशिरा अचानक पाचव्या मजल्यावर धावत गेली व तिथून तिने खाली उडी मारली. दरम्यान,झालेल्या आवाजामुळे परिसरातील इतर विद्यार्थिनींनी तिच्याकडे धाव घेतली.
यानंतर शाळा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन तिला तात्काळ उपचारासाठी भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला मुंबईतील जे . जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली? त्याचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.