ठाणे - अज्ञान असतानाही सज्ञान असल्याचे भासवून राज्य उत्पादन शुलक अधिकारी यांची फसवणूक करीत वाशी परिसरात सद्गुरू बार अँड हॉटेलचा परवाना काढला होता. या प्रकरणी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. बुधवारी समीर वानखेडे हे सकाळी ११ वाजत कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाले. कोपरी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला. जबाब नोंदविण्याची आणि चौकशीची प्रक्रिया ही तब्बल आठ तास सुरूच होती. कोपरी पोलिसांनी समीर वानखेडे यांचा सहा पानांचा जबाब नोंदविल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा - मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने
सन १९९६-९७ दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे यांच्याकडून परवाना कक्ष अनुज्ञप्ती प्राप्त करताना खोट्या माहितीचे शपथपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली. वाशी येथील सद्गुरू बार अँड हॉटेलचा परवाना मिळवला होता. म्हणून प्रथम समीर वानखेडे यांच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हा हा कोपरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. दरम्यान हॉटेलचा परवाना रद्द आणि कोपरीतील गुन्ह्याबाबत उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर त्वरित सुनावणीसाठी न्यायालयात प्रकरण आल्यानंतर मात्र न्यायालयाने ताशेरे ओढले होते. दरम्यान न्यायालयाने समीर वानखेडे यांना तूर्तास दिलासा दिला. त्यानंतर समीर वानखेडे हे बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर रात्री ७.४५ वाजेपर्यंत चौकशी आणि जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
आठ तास चौकशी आणि नोंदविला ६ पानांचा जबाब
न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी सकाळी कोपरी पोलीस ठाण्यात ११.३० वाजण्याच्या सुमारास आलेले समीर वानखेडे हे संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले. दरम्यान कोपरी पोलिसांनी त्यांची चौकशी करून कोपरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याबाबत तब्बल सहा पानांचा जबाब नोंदविला आहे. समीर वानखेडे यांनी कोपरी पोलिसांना चौकशी दरम्यान सहकार्य केले. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे समीर वानखेडे यांनी दिल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, जर तपासात समीर वानखेडे यांची गरज भासल्यास त्यांना पुन्हा बोलविण्यात येणार. जबाब नोंदविल्यानंतर वानखेडे हे रात्री 8 वाजता पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले.
चौकशीत पोलिसांना सहकार्य करणार - समीर वानखेडे
कोपरी पोलीस ठाण्यात आठ तास चौकशी आणि जबाब नोंदवून बाहेर पडलेल्या समीर वानखेडे यांनी पत्रकारांशी संपर्क साधला. पत्रकारांनी नवाब मलिक यांच्याबाबत विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. जे काही सांगायचे ते कोपरी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे यावर जास्त बोलणार नाही. मी चौकशीत आणि तपासात पोलिसांना सहकार्य करणार आहे. जेव्हा जेव्हा पोलीस बोलावतील तेव्हा मी हजर राहून सहकार्य करणार असलयाचे समीर वानखेडे यांनी सांगितले.
हेही वाचा - प्रियकराचा प्रेयसीवर चाकू हल्ला...भाईंदरमधील घटना