ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद आहे. याचाच फायदा घेत चोरटयांनी अंबरनाथ पूर्वेतील राहुल इस्टेट येथील शिवकेदार परिसरात विशाल बियर शॉप फोडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बियर शॉपमधील सीसीटीव्हीत चोरट्यांची छबी कैद झाली आहे.
सध्या देशभरात लॉडडाऊन सुरु असल्याने अत्यावश्यक सेवेत मोडणारी किराणा दुकाने, दूध आणि भाजी विक्री आणि दवाखाने तसेच औषधालये वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. यात तळीरामांची मोठी अडचण झाली आहे. राज्यात १९ मार्चपासून अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तर २२ मार्च नंतर राज्यात तर २५ मार्च नंतर देशात सक्तीने टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे मार्च महिन्यात बंद झालेली मद्याची दुकाने आजतागायत बंद आहेत. त्यामुळे दररोज मद्यपान करणाऱ्या तळीरामांची अस्वस्थता वाढली आहे.
याच अस्वस्थतेतून आता मद्याची दुकानांत चोरीचे प्रमाण वाढले आहे. अंबरनाथमध्येही अशाच प्रकारे एक बियर शॉप फोडून सीसीटीव्हीत दिसणाऱ्या पाच अज्ञात चोरट्याने ९ हजारांच्या बियरच्या बाटल्या लंपास केल्या आहे.
तसेच या शॉपमधून चोरट्याने विविध कंपन्यांचे शेकडो नग बियरचे टीन चोरले आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरटयांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.