ठाणे - डोंबिवलीतील एका बार मधून रिक्षाचालकाचे अपहरण करुन त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलिसांनी भाजपप्रणित रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यासह ५ ते ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात आज सायंकाळी २ जणांना अटक केली आहे. संजय विठ्ठल काके (२५) आणि कृष्णा कल्याणकर (२५), अशी दोघांना अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मुख्य सूत्रधार दत्ता माळेकर, रवी माळेकरसह ४ आरोपी अद्यापही फरार आहेत.
बाबासाहेब कांबळे (३४) असे अपहरण करुन बेदम मारहाणीत जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. तो डोंबिवली पूर्वच्या शेलार नाक्यावरील राजू नगर परिसरात राहतो. शनिवारी रात्री त्याला काही जणांनी जानकी हॉटेल परिसरातून रिक्षात उचलून नेल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला मिळाली. त्यामुळे अपहरण झालेल्या रिक्षाचालकाचा भाऊ सिद्धार्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी त्याचा भाऊ बाबासाहेब हा रक्तबंबाळ अवस्थेत सीलाब नाक्यावर पडलेला आढळून आला. त्यांनी भाजपाप्रणित रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर आणि रवी माळेकर आणि त्यांच्या ५ ते ६ साथीदारांनी अपहरण करुन अज्ञात स्थळी नेऊन तेथे लोखंडी रॉड आणि वायरच्या साह्याने बेदम मारहाण केली, अशी माहिती पोलिसांना आणि नातेवाईकांना दिली .
गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा भाजपच्या रिक्षा युनियनचे पदाधिकारी तसेच खजिनदार दत्ता माळेकर, रवी माळेकर आणि ५ ते ६ जणांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या हॉटेलमधून कांबळे यांचे अपहरण झाले होते. त्या हॉटेलमधील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर २० तासानंतर २ आरोपींना अटक केली आहे.