ठाणे - मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठाण्यातील अनेक परिसरामध्ये आज पाणी साचले. ठाण्यात अनेक ठिकाणी पावसाने मोठे नुकसान झाले असून अनेक घरात घरात शिरले असून मुंब्रामध्ये घरांचे नुकसान झाले आहे. ठाण्यातील मुख्य बाजारपेठ परिसर, वंदना सिनेमा परिसर, संभाजीनगर परिसर वृंदावन परिसर या भागात दोन ते अडीच फूट पाणी साचले होते आणि यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
आतापर्यंत ठाण्याची परिस्थिती -
अतिवृष्टीमुळे ठाण्यात 6 ठिकाणी झाडे पडले, तर एका ठिकाणी फांदी पडली आहे. शहरात 47 ठिकाणी पाणी भरले असून मनोरमा नगर, सावरकर नगर येथे संरक्षण भिंत कोसळून 4 वाहनांचे नुकसान झाले आहे. बुधवारी दिवसभरात सकाळी 11.30 ते 12.30 या दरम्यान मोठा पाऊस पडला. तर मुंब्र्यात 2 ठिकाणी भूस्खलन झाले आहे.
ठाण्यात तीन ठिकाणी संरक्षक भिंत पडल्याने गाड्यांचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. पहिली घटना ही सावरकर नगर येथे पंचामृत सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याने घडली आहे. ही भिंत कोसळल्याने रस्त्यावर असलेल्या पाच ते सहा खासगी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरी घटना मनोरमा नगर येथील स्वामी समर्थ फेज वन, सुकुर गार्डन परिसरात घडली आहे. तर तिसरी घटना ही मुंब्रा येथे घडली असून एका मैदानाची संरक्षक भिंत एका घरावर पडल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने तीनही घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला शहराचा आढावा -
पालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट देऊन घेतली विविध परिस्थितीची माहिती घेतली. तसेच पालिकेच्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे शिंदे यांनी आदेश दिले आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सज्ज राहण्याचा सूचना दिल्या आहेत. सखल भागात पाणी साचू नये, यासाठी खाडीच्या तोंडावरचे नाले मोठे करून कायमस्वरूपी पाणी तुंबण्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या सूचना.
घरात शिरले पाणी -
ठाण्यातील संभाजीनगर परिसरामध्ये सकाळपासून पाणी मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. संभाजीनगर परिसरातील नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक घरांमध्ये नाल्याचे पाणी घुसले. यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे.
मुंब्रा येथे घरावर भिंत पडली -
मुंब्रा येथील घासवाला कंपाउंड येथे एका घरावर भिंत पडल्याची घटना घडली आहे. मुंब्रा येथील मालिक टॉवरची बाँड्रीची भिंत ही शेजारी असलेल्या एका घरावर पडली. या घरात एक वृद्ध व्यक्ती राहत होते. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून घराचे मात्र नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेची आपत्कालीन विभाग घटनास्थळी पोहचून पडलेल्या भिंतीचा मलबा हटविण्याचे काम सुरू आहे.