ठाणे - गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी कमरेला पिस्तुल लावून फिरताना पोलिसांच्या जाळयात सापडला आहे. हा आरोपी उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हद्दीत काही दिवसापूर्वी २ गुंडांवर धारदार शस्त्राने हल्ला करून फरार झाला होता. दरम्यान, गुन्हेगाराला पोलिसांनी उल्हानसागर कँप नंबर ४ येथील माणेरे गावातून ताब्यात घेतले. तसेच त्याच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. रुतिक मुकेश तेजी (वय,२० रा. महात्मा फुले, उल्हासनगर ) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर आरोपी रुतिक हा उल्हासनगर शिवसेना उपशहर प्रमुखाचा पुतण्या असल्याचे समोर आले आहे.
खळबळजनक बाब म्हणजे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. तर त्याच्या कमरेला विदेशी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. धक्कदायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी अंबरनाथ मधील मटका चौकात पोलिसांवर तलवारीने हल्ला करणाऱ्या आरोपींवर याच सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने हल्ला केला होता.
आरोपी रुतिकने गुंडाचा पाठलाग करून केला होता हल्ला-
२४ ऑक्टोबर रोजी गुंडाचा एका टोळक्याने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गाडी फोडली. तिथून एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर त्यांनी हल्ला केला. त्यावेळी आरोपी रुतिकने साथीदारांच्या मदतीने याच गुंडाचा पाठलाग करून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून पसार झाला होता. खळबळजनक म्हणजे सराईत गुन्हेगार रुतिकने ज्या गुंडांवर हल्ला केला होता. त्याच गुंडानी जखमी अवस्थेत पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता.
आरोपी रुतिकने हल्ल्यात जखमी केलेल्या गुंडाकडून पोलिसांवर तलवारीने हल्ला-
पोलीस कर्मचारी बाळू चव्हाण हे २४ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी रात्री आपली ड्युटी संपवून घरी बदलापूरला निघाले होते. त्यावेळी अंबरनाथ मटका चौक भागात वाहतूक कोंडी झाली असताना एका कारमध्ये चार जण रक्ताने माखलेल्या अवस्थेत बसलेले दिसले. त्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी या चौघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र या चौघांनी गाडीतून उतरून त्यांच्या डोक्यात तलवारीने वार केले होते. त्यावेळी पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चार गुन्हेगारांना एका तासातच पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
हेही वाचा- मराठा आरक्षणात राज्य सरकारकडून घोडचुका - विनायक मेटे