ठाणे - शस्त्राचा धाक दाखवून सराफी पेढ्या लुटणाऱ्या 9 जणांच्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने कळव्यातील सराफाला लुटण्याचा प्रयत्न केला होता. हाच धागा पकडून 2 मुख्य आरोपींसह 7 जणांना कळवा पोलिसांनी 24 तासात अटक केली. त्यांच्याकडून 4 गावठी कट्टे, रिव्हॉल्वर व 8 जीवंत काडतुसे असा शस्त्रात्रांचा साठा जप्त करण्यात आला. या टोळीने सहा सराफी पेढीत लूट केल्याची कबुली दिल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यानी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
गुरुवारी रात्री कळवा पूर्वेकडील के. के. ज्वेलर्सचे मालक आपले दुकान बंद करत असताना चार ते पाच जणांनी शस्त्राचा धाक दाखवून त्याना लुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, सराफाने विरोध करताच त्याच्या डोक्यात प्रहार करून हवेत गोळीबार करत तेथून दरोडेखोरांनी पळ काढला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. घटनास्थळीचे पुरावे व सीसीटीव्हीचे फुटेज पाहून संशयित आरोपी आकाश चौधरी (28) मुलुंड याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. चौकशीअंती मुख्य आरोपी मुलचंद विश्वकर्मा (45) व संदीपकुमार सिंग (26) यांच्यासह सुशीलकुमार चौहान (39), आकाश चौधरी(28), धर्मवीर पाशी (19), भोलासिंग सिंह (20), सत्तमसिंग शुक्ला (20), सोनू सिंह (23) यांना कळवा पोलिसांनी 24 तासात अटक केली. यातील मूलचंद व संदिपकुमार हे दोघे मास्टर माईंड असून ते रेकी करून दरोड्याची योजना आखत असत. या टोळीवर मुंब्रा, कल्याण, डायघर, उल्हासनगर आदी सहा ठिकाणी ज्वेलर्सना लुटण्याचे गुन्हे दाखल आहेत.