ठाणे - जिल्ह्यातील पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट असलेली कामे करणे आवश्यक असल्याने, आरोग्य सुविधेच्या अटींच्या अधीन राहून अनेक कामे सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाळ्यापूर्वीची कामे आता मार्गी लागणार आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थतीत बंद ठेवण्यात आलेल्या आस्थापना १४ एप्रिलपर्यंत बंद राहतील. मात्र रस्ते, वीज, पाणी, दूरसंचार यंत्रणा, जलनिस्सारण, इंटरनेट आदी कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, तसेच राज्य व प्रमुख महामार्गांची कामे व पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे, ग्रामीण रस्ते, पंतप्रधान सडक योजने अंतर्गत रस्ते, महावितरण व महापारेषण आणि महावीजनिर्मिती, इतर विद्युत विषय विभागाकडील विजेचे खांब टाकणे, विजेची दुरुस्ती, भारत संचार निगम लिमिटेड आणि इतर दूरसंचार कंपनीच्या दूरसंचार व इंटरनेट सेवा संचालन, लाइन मेंटेनन्स, कामे तसेच पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण आणि स्वच्छतेची कामे सध्याची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता, ही सर्व कामे तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा कोलमडू नये, यासाठी हे काम करणाऱ्या व्यक्तींनी प्रशासनाच्या आदेशाची प्रत, तसेच कार्यालयाचे ओळखपत्र सोबत ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.Conclusion: