ठाणे - 'मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ओळखताना त्यांनी अंगावर गोळीही झेलली होती. आम्ही नेहमीच अशा योध्यांचा सन्मान करतो' असे उद्गार माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबई हल्ल्यातील साक्षीदार असणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस हे कल्याण येथील आयुष रुग्णालयात आले होते. यावेळी फडणवीस यांनी श्रीवर्धनकर यांच्या उपचाराचा खर्च भाजप करणार असल्याचे सांगितले. तसे सांगताना फडणवीस यांनी भाजपतर्फे श्रीवर्धनकर कुटुंबीयांना १० लाखांचा मदतनिधी देत असल्याचे जाहीर केले.
हेही वाचा... 'मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी'
कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या दोन गोळ्या झेलणारे श्रीवर्धनकर चार दिवसापूर्वी मुंबईतील फुटपाथवर आढळले होते. त्यांनतर ते राहत असलेल्या परिसरातील कल्याण डोंबिवली महापालिकेचे भाजप नगरसेवक गायकवाड यांनी श्रीवर्धनकर यांना रुग्णालयात दाखल केले. देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यावेळी उपस्थित होते.
कोण आहेत हरिश्चंद्र श्रीवर्धनकर ?
हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे दहशतवादी कसाबला फाशी देण्यात मुख्य साक्षीदारांपैकी होते. श्रीवर्धनकर यांनी विशेष न्यायालयासमोर कसाबला ओळखले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीत कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल याने दोन गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. श्रीवर्धनकर सध्याच्या घडीला कठीण परिस्थितीत आहेत. त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या उपचाराा खर्च परवडत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ते निराधार अवस्थेत फुटपाथवर आढळून आले. बरेच दिवस त्यांच्या पोटात अन्न गेले नव्हते. तेव्हा मुंबईतील सातरस्ता येथील डिसुझा नामक दुकानदाराने त्यांना मदत केली आणि पोलिसांच्या मदतीने त्यांच्या कुटुबांची भेट घडवून आणली. मात्र, आजही त्यांचे कुटुंबिय त्यांना वृद्धश्रमात ठेवण्यासाठी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.