ठाणे - ठाण्यातील एका युवकाने आपल्या घरात हजारो गणेशमूर्तीचे संकलन करून अनोखा छंद जोपासला आहे. दिलीप वैती असे या अवलीयाचे नाव आहे. देश-विदेशातील हजारोच्या वर गणेश मूर्तींचा संग्रह वैती यांच्या घरात आहे. गेली 33 वर्षे त्यांचा हा शिरस्ता सुरु असून भविष्यात सृष्टी गणेशा या उपक्रमाद्वारे देववृक्षाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
ठाण्यातील गणेश भक्ताकडे एक हजार गणेश मूर्ती ठाण्यातील राबोडी या मुस्लीमबहुल भागात राहणारे दिलीप वैती कुठलेही व्रतवैकल्य अथवा उपासतपास करीत नाहीत. तरीही त्यांच्यात गणेशभक्ती भरलेली आहे. त्यांच्या घरी पूर्वजांपासून नवसाच्या गणपतीची स्थापना करण्यात येते. याच प्रेरणेतून वयाच्या 17 व्या वर्षी 1989 साली त्यांनी मुंबईतील प्रदर्शनातून शिळेची पहिली गणेशमूर्ती घरात आणली. आणि याच पहिल्या मूर्तीवरून घरात त्यांना बरीच बोलणी खावी लागली. मात्र,कालांतराने हीच वैती कुटुंबाची हीच ओळख बनली आहे. व्यवसायाने कलाकार असलेल्या दिलीप यांनी जेजे कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्ट्सचे शिक्षण घेतले.
एक हजार गणेशमूर्ती
20 ग्रॅम वजनाच्या मूर्तीपासून ते ३०० किलोपर्यंत आणि अर्धा इंचापासून ते ४ फुटी गणेशमूर्तीचा संग्रह त्यांच्या घरातच केला आहे. यासाठी त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरील दोन खोल्यामध्ये हा संग्रह ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्यात कृषीगणेशा ते विश्वविनायकाच्या मूर्त्यांचा समावेश आहे. यात लक्ष वेधून घेणारी स्त्रीरूपी गणेश मूर्ती मनमोहक रुपात आहे. याच बरोबरच अखंड लाकडापासून तयार केलेली एक गणेश मूर्ती आहे. या मूर्तीच्या मागच्या बाजूस नरसिंहाची कलाकृती असून, दुर्मिळ आहे. माती, शाडू, लाकूड, सोने-चांदी, पंचधातू, तांबे, पितळ, शंख-शिंपले, नारळाची करवंटी, फायबर, सिरॅमिकटेराकोटा, मार्बल, मशरूम, दगड, काच अशा अनेक गणेश मूर्ती आहेत.
विविध आकारातील गणेश मूर्तीं आरामदायी आसनेत असलेले गणराय, क्रिकेट खेळणारे बाप्पा विविध पोझमधील बाप्पा, सभागायन करताना,खुर्चीवर पुस्तक वाचताना, बुद्धिबळ खेळताना, व्यायाम करताना, मूषकराजांच्या शाळेत शिकवताना, आदिवासी वेशात, बालरूपात, पाळण्यात सृष्टी गणेश ते विश्वविनायक अशा अनेक रूपात लोभस गणेशाच्या मूर्ती मन मोहून घेतात. यात जपान, इंडोनेशियासह कंबोडिया आदी देशातील आणि भारतभरातील मूर्ती आहेत.
हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांविरुद्ध ED चा ससेमिरा.. आतापर्यंत 'या' नेत्यांना समन्स अन् कारवाईचा घटनाक्रम