नवी मुंबई - ख्रिसमस सण हा अबालवृद्ध सर्वांसाठी आनंद देणारा असतो. यामुळे सगळीकडे उत्सहाचे वातावरण पहायला मिळते. अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळसाठी सध्या नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत. अनेक दुकानांत ख्रिसमससाठी लागणाऱ्या सजावटीसाठीच्या आकर्षक वस्तु उपलब्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, आकाश दिवे हे सर्वांचेच आकर्षण ठरत आहे.
हेही वाचा... नो टू सिंगल यूज प्लास्टिक : गाझियाबाद महानगरपालिका राबवत आहे स्तुत्य उपक्रम
ख्रिसमस सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली असून, शहरातील अनेक भागातील दुकानात आवश्यक त्या वस्तूंची आकर्षक पद्धतीने मांडणी केलेली आहे. लहान आणि मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, जिंगलबेल्स, चांदण्या, सांताक्लॉजचे शर्ट, शुभेच्छापत्रे, सांताक्लॉजची टोपी, कपडे, चॉकलेट्स, कॅडबरी, सजावटीचे साहित्य अशा विविध वस्तू बाजापेठात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या रेडिमेड दृश्यांना खरेदी करण्याचे बरेच प्राधान्य मिळत आहे. विशेषत: रंगीबेरंगी मेणबत्त्या आणि डिझायनर जिंगल बेल्सला अधिक मागणी आहे. तसेच विविध प्रकारचे गिफ्टबॉक्सही उपलब्ध आहेत.
हेही वाचा... 24 आणि 25 डिसेंबरला राज्यातील काही भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंंदाज
शाळेतील मुलांमध्ये ख्रिसमससाठी मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. संगीताचे कार्यक्रम, नाट्यस्पर्धा, ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रम शाळेत होत असतात. ख्रिसमस काही क्षणावर येऊन ठेपल्याने लगबग वाढली आहे. सर्वत्र चैतन्य निर्माण होऊन जो तो आपापल्या परीने सण साजरा करण्याच्या तयारीत गुंतला आहे. नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी कापड बाजारात मोठी गर्दी झाली आहे. विविध आकर्षक कपडे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे.
हेही वाचा... #CAA कोलकाता : राज्यपालांना विद्यापीठात येण्यापासून रोखले, विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनीही दाखवले काळे झेंडे
बच्चे कंपनीचे खास आकर्षण असलेल्या सांताक्लॉजच्या टोप्या विक्रीसाठी परराज्यातून विक्रेते शहरात आल्या आहेत. रस्त्याच्या कडेला दुकाने थाटून या टोप्यांची विक्री केली जात आहे. या दुकानांवर ग्राहकांनी गर्दी केली असून आकर्षक टोप्या खरेदी केल्या जात आहेत. सजावटीसाठी आवश्यक असणाऱ्या शोभेच्या वस्तूंचीही मोठी खरेदी केली जात आहे. महागाईचे सावट बाजारपेठेत दिसून येत आहे. विविध वस्तूंच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेत साधारण २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली. ग्राहकांच्या उत्साहात मात्र उणीव झाल्याचे दिसून आलेले नाही. वस्तूंच्या किमती वाढल्या असतानाही बाजारात ग्राहकांची गर्दीही वाढत चालली आहे. शिवाय चिनी वस्तूंच्या तुलनेत भारतीय वस्तू आकर्षक व स्वस्त असल्याने भारतीय वस्तूंना मागणी मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.