ठाणे - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीवर निर्सग वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे ठाण्यातील गायमुख चौपाटीला टाळे लावण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीवर निसर्ग वादळाचे सावट घोंगावत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर आदी कोकण किनारपट्टीवरील शहरांवर या वादळाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यामध्ये अंदाजे तशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच या वादाळाचा कालावधी 1 ते 3 जून असा असणार आहे. यासाठी सतर्कता म्हणून एनडीआरएफची एक स्वतंत्र टीम जिल्ह्यात पाचारण करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागात ही टीम असणार असून किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क करण्यात आलेले आहे. मत्सविभागाने देखील या कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, अशा सूचना दिल्या आहेत. याकालावधीत मुसळधार व अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. याचा परिणाम आज दुपारपासून जाणवणार आहे. यासाठीच खास करून गायमुख चौपाटी बंद ठेवण्यात आली.