मिरा भाईंदर(ठाणे) - भाईंदर पूर्वेला सकाळची फेरी मारण्यासाठी गेलेल्या एका महिलेला मी पोलीस आहे, असे सांगत चोरट्याने सोनसाखळी खेचून पळ काढला. नवघर पोलिसांनी शिताफीने सापळा रचून इराणी गॅंगच्या दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, आरोपींना अटक करताना पोलिसांच्या पथकावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला केला.
नेमकं प्रकरण काय -
5 नोव्हेंबर 20 ला फेरी मारण्यासाठी गेलेल्या महिलेला दोन चोरट्यांनी पोलीस असल्याचे सांगत थांबवले. मैं एक पुलिस हू, आगे एक औरत का मर्डर हुआ है. उसने गले में सोना पेहना था. उसका गला काट दिया है, असे चोरट्यांनी महिलेला सांगितले. तीच्या हातात एक पुडी देऊन महिलेच्या गळ्यातील 12 ग्रॅम सोनसाखळी खेचली आणि पळ काढला. याप्रकरणी महिलेने नवघर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांची कारवाई -
सोनसाखळी चोरट्यांना पकडण्यासाठी नवघर पोलिसांकडून पथक नेमण्यात आले. या पथकाने घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास करून गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेतला. तेव्हा सदरचे आरोपी हे पिराणी पाडा भिवंडी, कल्याण आंबिवली येथील लोकवस्तीमध्ये राहणारे असल्याची खात्री झाली. पोलिसांना आरोपी वफा कंपाउंड भिवंडी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहितीनुसार पोलिसांनी मुस्लिम वेशभूषा परिधान करत सापळा रचला आणि आरोपींना अटक केली. मात्र, आरोपींनी ओरडाओरड केल्याने इराणी समाजाच्या नागरिकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यामध्ये किरकोळ जखमी झाले. आरोपींना न्यायालयाने 17 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मोक्कामधील फरार आरोपी...?
भिवंडी, कल्याण आणि आंबिवली या भागात मोठ्या प्रमाणात इराणी समाजाचे वास्तव्य आहे. नवघर पोलिसांनी अटक केलेले आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले. मुंबई ठाणे तसेच इतर अनेक ठिकाणी जबर चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी तसेच विविध प्रकरणात गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झाले आहे. तसेच यामधील एक आरोपी मोक्का कायदामध्ये फरार असल्याचं आढळून आले आले. आरोपींचे संपूर्ण कुटुंब चोरी, दरोडा अशा विविध प्रकरणात सामिल आहे.
महिलांनी काळजी घेणे गरजेचे -
पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. तरीही महिलांनी सकाळी फेरफटका मारायला जाताना सोन्याचे दागिने घालणे शक्यतो टाळावे, असे आवाहन नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी केले.
हेही वाचा - टीआरपी घोटाळा : कुठपर्यंत गेला मुंबई पोलिसांचा तपास