ठाणे - आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' उपक्रमांंतर्गत केंद्रीय गृहमंत्र्यांनी 'हर घर तिरंगा' कार्यक्रमाला मान्यता दिली आहे. याअंतर्गत सर्व भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( Tribal People Participant In Har Ghar Tiranga initiative ) देशभर हा उपक्रम घरात घरात पोचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकराने विविध संस्थाच्या माध्यामातून जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उमेदीच्या काळात शिक्षणापासून वंचीत राहिलेल्या आजीबाईंसाठी मुरबाडच्या फांगणे गावात आजीबाईंची शाळा सुरू करण्यात आली होती. अक्षर ओळख झाल्यानंतर या आजीबाईंनी विविध उपक्रमातून आयुष्याला नवा रंग दिला. गेल्या काही वर्षांपासून या आजीबाई रक्षाबंधनासाठी पर्यावरणस्नेही राख्या तयार करत असतात. यंदा देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्याबाबत संदेश देणाऱ्या राख्या या आजीबाई तयार करत आहेत. आतापर्यंत 30 आजीबाईंनी मिळून एक हजारांहून अधिक राख्या तयार केल्या आहेत.
सहा वर्षांपूर्वी आजीबाईंच्या शाळेला सुरूवात - ग्रामीण भाग आणि कमी वयात झालेली लग्न, घरकाम, कुटुंबाच्या शेतीत हातभार लावण्याचा आग्रह असल्याने महिलांच्या एका पिढीला शिक्षणाला मुकावे लागले. त्यामुळे उमेदीच्या काळात शिक्षण राहिल्याने अक्षर ओळखही राहिलीच. मात्र, उतारवयात किमान एकदातरी गावात येणारी बसवर लावलेली पाटी वाचता यावी. स्वतःचे नाव लिहता यावे, या हेतूने अंबरनाथच्या कै. मोतीराम दलाल चॅरीटेबल ट्रस्ट आणि जिल्हा परिषद शाळा फांगणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहा वर्षांपूर्वी फांगणे गावात आजीबाईंच्या शाळेला सुरूवात करण्यात आली. वय वर्षे 60 ते 90 या वयोगटातील आजीबाई या शाळेत सहभागी झाल्या. आपल्या नातवांना शाळेत सोडण्याच्या वयात या आजीबाईंनी बाराखडी गिरवण्यास सुरूवात केली होती.
आजीबाई रमल्या राख्या निर्मितीत - या शाळेची दखल जगभरात घेतली गेली. दिलीप दलाल आणि स्थानिक शिक्षक योगेंद्र बांगर यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या या शाळेची महती सर्वदूर पसरली. अक्षर ओळख इतक्यापुरती शाळेची ओळख राहिली नाही. योगेंद्र बांगर यांच्या कल्पक बुद्धीने त्यांनी आजीबाईंना विविध उपक्रम दिले. यात सर्वात यशस्वी उपक्रम राखी निर्मितीचा ठरला. पर्यावरणस्नेही साहित्य वापरून राख्यांची निर्मिती केली गेली. त्या नाममात्र दरात सामाजिक संस्था, शासकीय कार्यालयांमध्ये देण्यात आल्या. यंदाच्या वर्षातही हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
अमृत महोत्सव संदेश यंदाच्या राख्यांवर - आजीबाई सध्या पर्यावरणस्नेही राख्या तयार करण्याच्या कामात गुंतल्या आहेत. या कामात 60 वर्षांपासूनच्या 30 आजीबाई सहभागी झाल्या आहेत. याकामी त्यांना शीतल मोरे या शिक्षिका सहकार्य करतात. या आजीबाईंनी गेल्या काही दिवसांत एक हजारांहून अधिक राख्या तयार केल्या असून, त्या शासकीय कार्यालयांमध्ये मागवण्यात आल्या आहेत, अशी माहिती योगेंद्र बांगर यांनी दिली आहे. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असून तसा संदेश यंदाच्या राख्यांवर देण्यात आला आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना आपणही त्यात काहीतरी खारीचा वाटा उचलत आहोत, ही भावना आजीबाईंसाठी मोठी असल्याचे योगेंद्र बांगर यांनी सांगितले आहे.
सात समुद्रपार आजीबाईची शाळेची ओळख - जगप्रसिद्ध लिम्का बुक प्राप्त रेकॉर्ड प्राप्त, कौन बनेगा करोडपती शोमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी गौरव केलेली आजीबाई शाळा फांगणे येथे देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा या राज्य शासनाच्या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी मिळण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी राख्यांची निर्मिती केली आहे. आजीबाईनी जिद्द कष्ट, त्याग याद्वारे अधोरेखित केले आहे. आतापर्यंत देशविदेशातील अनेक मान्यवर, पत्रकार यांनी या उपक्रमाला भेट दिली असून अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, अशा देशातील २० हून अधिक विदेशी पाहुण्यांनी या शाळेला भेटी देऊन आजीबाईंचा गौरव केला.