ठाणे - देशभरात 45 दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. हाताला काम नसल्याने उत्पन्न नाही आणि कोरोनाच्या भीतीमुळे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर परिसरात अडकलेल्या लाखो मजुरांनी आता आपल्या गावचा रस्ता पकडला आहे. गाडी, सायकल, रिक्षा, हातगाडी असे मिळेल ते साधन घेऊन हे मजुरांचे लोंढे ईस्टर्न महामार्गावरून निघाले आहेत. ते भिवंडी, कसारा, नाशिकमार्गे आपापल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
मोठ्या प्रमाणात लोकांचा जथ्था घेऊन निघालेल्या या मजुरांच्या दैनंदिन गरजाही पूर्ण होणे कठीण बनले आहे. नाक्या-नाक्यावरील पोलीस बंदोबस्तामुळे या मजुरांचे हाल होत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत सुद्धा माणुसकी अजून जिवंत आहे, हा प्रत्यय दाखवत अनेक लोक या मजुरांना अन्नपाणी देत आहेत. लाखो लोक आजमितीला या ईस्टर्न महामार्गावरून नाशिक कसारा इंदोर या मार्गावर दिसत आहेत. लहान मुलं महिला वृद्ध हे सर्व चालत चालत जाऊन आपले गाव गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. रेल्वेसेवा सुरू न झाल्यामुळे त्यांना गावी जाण्यासाठी कोणताच पर्याय उपलब्ध झाला नाही आणि मग मिळेल ते वाहन करून आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न या मजुरांचा सुरू आहे. काही ठिकाणी त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा होतो.
मात्र, कोणत्याही परिस्थितीत गावी जाण्याच्या ठाम निश्चय केलेले हे लाखो लोकांचे थवे हे गावी जाण्यासाठी निघाले आहेत.
रस्त्याने जावे तर पोलीस अडवतात, पटरीवरून जावे तर अपघात होतो. अशा परिस्थितीत मजूर आपल्या गावचा प्रवास करत आहेत, सोबत काही कपडे पाणी आणि मोबाईल घेतला आहे. जिथे शक्य तिथे मोबाईल चार्ज करायचा आणि पुढे निघायचे. यातील काही लोकांशी आपण बोललो तर त्यांना गावी जाण्यासाठी महिनाभराचा देखील कालावधी लागू शकतो. एवढे अंतर ते पायी कापायच्या तयारीत आहेत. काही लोकांच्या खिशात काहीच पैसा नाही. मात्र, गावी पोचण्याची मनामध्ये जिद्द आहे, काही लोकांकडे पैसे आहेत. मात्र, त्या पैशांचा काय उपयोग असे ते सांगतात. काही नाक्यावरती या मजुरांकडून पैसे देखील पोलिसांनी घेतल्याचे ते सांगतात.
अपघाताची शक्यता
रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून पोलिसांनी याबाबतीत खबरदारी घेणे आवश्यक आह.