ठाणे- नमस्कार मी आमदार निरंजन डावखरे बोलत आहे, अस सांगून बनावट मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअॅपच्या माध्यमातून हजारो रुपये मागितले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत स्वतः निरंजन डावखरे यांनी पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. तसेच माझ्या परिचयातील कोणाला असा मेसेज आल्यास विश्वास ठेवू नका, असे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले आहे. हे पैसे मागताना डावखरे यांचा डीपी ठेवला होता. त्यामुळे या मेसेजचे गांभीर्य वाढले आहे.
फेक मेसेजवर विश्वास ठेवू नका-
मी भाजप आमदार निरंजन डावखरे बोलत असून मला काही पैशांची गरज असल्याचे मेसेज लोकांना करून ऑनलाईन पध्दतीने मला पैसे पाठवा, काही दिवसात मी आपले पैसे परत करेन, अश्या पध्दतीने मेसेज करण्यात येत आहेत. ही बाब डावखरे यांच्या मित्राचा लक्षात आली. तर त्यांनी मी कुणाकडेही पैसे मागितले नाही, असे सांगितले. दरम्यान हा फसवणूक करणारा प्रकार निरंजन डावखरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सूचना केली आहे. तसेच अश्या फेक मेसेजवर विश्वास ठेवू नका, असे सांगितले. या गंभीर प्रकरणाबाबत तक्रार करणार असल्याचे निरंजन डावखरे यांनी यावेळी सांगितले.
डावखरे यांच्या आधी पोलीस अधिकारी झाले होते टार्गेट
ठाण्यात या आधी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांगले यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून लोकांकडून पैसे मागण्याचा प्रकार झाला आहे. अशा प्रकारचे अनेक गुन्हे दररोज होत असून हे प्रकार रोखले पाहिजे, असे आवाहन आता ठाणे पोलीस करत आहेत.
हेही वाचा- सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांविरोधात दिला हक्कभंग प्रस्ताव