ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबद्दल घेतलेल्या भूमिकेवर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) एकमेकांवर टीका करत आहेत. या विषयावरून गृहनिर्माण मंत्री जिंतेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही राज ठाकरेंवर टीका केली होती. यावर मनसे नेते आता आक्रमक झाले आहेत. मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले आहे. भोंगा, मस्जिद, मुसलमान असे ऐकले की जितेंद्र आव्हाड यांच्या अंगात येते, असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांच्याबद्दल बोलले की प्रसिद्धी मिळते - राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसेकडून अनेक ठिकाणी भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्यात येत आहे. यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. याला मनसे नेते अविनाश जाधव यांनी उत्तर दिले आहे. भोंगा, मस्जिद, मुसलमान असे ऐकले तर जितेंद्र आव्हाड यांच्या अंगात येते. राज ठाकरे यांच्याबद्दल बोलले की प्रसिद्धी मिळते, जितेंद्र आव्हाड हे आपल्या मतदारसंघाबद्दल प्रेम दाखवण्यासाठी आणि आपल्या मतदारसंघात मतदार नाराज होऊ नये यासाठी अशी विधाने करतात, अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.
अविनाश जाधव यांचा जितेंद्र आव्हाड यांना इशारा - राज ठाकरे यांनी घेतलेल्या भुमिकेवरून राज्यात दंगली घडतील असे काही नेत्यांना वाटते. मात्र, ठाण्यात अनेकदा दंगली घडल्या आहेत, मग ठाण्यातील राबोडी असो वा भिवंडी, भिवंडीत घडलेल्या दंगलीत दोन पोलिसांना आपला जीव गमवावा लागला तेव्हा आव्हाड यांना पुळका नाही आला. खरंतर दंगली राष्ट्रवादीला घडवायच्या आहेत, असे वक्तव्य अविनाश जाधव यांनी केले आहे. तर राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे काही दिवसांत ठाण्यातील मशिदींवरील भोंगे काढले गेले नाहीत तर मनसेकडून मशिदींबाहेर मोठंमोठे डीजे आणि भोंगे लावून हनुमान चालीसा लावली जाईल, असा इशारा देखील अविनाश जाधव यांनी दिला आहे.