नवी मुंबई (ठाणे) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १४ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजीत कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी मनसेचे नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच मनसेच्या शॅडो कॅबिनेटची देखील घोषणा केली. 'काँग्रेसने देशावर 50 वर्ष राज्य करुनही त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत आहे. मग फक्त आम्हालाच प्रश्न का विचारला जातो' असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
हेही वाचा... गणेश नाईकांच्या रक्तातच गद्दारी, आव्हाडांचा नाईकांवर निशाणा
... मग आम्हालाच प्रश्न का ?
'ज्या काँग्रेस पक्षाने ५०-६० वर्षे देशावर राज्य केले. त्या काँग्रेस पक्षाची आजची अवस्था बघा काय आहे. १४ वर्षांच्या काळात मनसे या पक्षाचे १३ आमदार निवडून आले. अनेक नगरसेवक निवडून आले. तेव्हा आम्हाला हेच प्रश्न आम्हाला विचारले जातात, तुमचे १३ आमदार निवडून आले होते. इतके नगरसेवक निवडून आले होते. मग पुढे काय झाले ? पण काँग्रेस पक्षाची आजची स्थिती काय झाली आहे. दिल्लीत निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. एवढेच नाही तर त्यांच्या ६३ आमदारांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांना कोणीही प्रश्न विचारत नाही. मग आम्हालाच प्रश्न का' असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
मतदान करायच्या वेळी सगळे कुठे जातात, समजत नाही...
'अनेकदा मला लोकांचेही काही कळत नाही. लोक काम पाहून मतदान करतात की नाही, हा प्रश्नच आहे. काम पाहून मतदान होणार नसेल तर मग विषयच संपला. जितकी आंदोलने मनसेने गेल्या १० वर्षात केली, तितकी कोणीच केली नाहीत. आपण लोकांना निकालही दाखवून दिले. पण मतदान करायच्या वेळी सगळे कुठे जातात, ते कळत नाही' अशी खंत यावेळी राज ठाकरेंनी व्यक्त केली.
हेही वाचा... लडंनची 'ही' तरुणी लढणार बिहार विधानसभा निवडणूक, मुख्यमंत्रीपदासाठी स्वत:च्या नावाची घोषणा
सरकारचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना...
सरकारने चुकीच्या गोष्टी केल्या तर त्यांचे वाभाडे काढण्यासाठी ; अध्यक्ष, सरचिटणीस व मंत्रीमंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 'सत्तेवर बसलेल्या लोकांना अपेक्षा न करता मतदान केले जाते. आम्ही जनेतला बांधील आहोत. त्यामुळे कामावर काहीही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. सरकारवर अंकुश असावा, म्हणून आम्ही हे मंत्रिमंडळ उभारले आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मात्र, ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाही, अशी तंबीही त्यांनी पदाधिकारी वर्गाला दिली.