मीरा भाईंदर - मीरा भाईंदर कामगार सेनेच्यावतीने आज मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. राज्यव्यापी या आंदोलनात मीरा भाईंदरमधील कर्मचारीदेखील सामील झाले होते. चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे. लवकरच राज्य सरकार व मनपा प्रशासनाने लक्ष नाही दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती कामगार सेनेचे सरचिटणीस श्याम म्हापळकर यांनी सांगितले.
पालिकेत ५३८ चतुर्थ श्रेणी कर्मचारी
मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये ५३८ चतुर्थ श्रेणी कर्मचारी राज्य सरकार संघटना व मीरा भाईंदर कामगार सेना संघटना यांच्याशी संलग्न असून त्यांना शासनाने २००० साली सेवेत सामावून घेतले, मात्र कोणताही लाभ दिला नाही, पदोन्नती नाही तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांनासुद्धा सेवेत सामावून घेतले नाही. अशा विविध मागण्या घेऊन आज राज्यव्यापी कर्मचारी सोबतच मीरा भाईंदरमधील महापालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
विविध मागण्या
मागील १४ वर्षांपासून शैक्षणिक पात्रता धारण करूनही त्यांना पदोन्नती दिली गेली नाही. त्याकरिता शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती देण्यात यावी. पालिकेत गेल्या १५ वर्षांपासून ५०० सफाई कर्मचारी पदे रिक्त असतानाही पालिका ती पदे भरत नाही. ती पदे तातडीने भरावी, अशा विविध मागण्या केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास अजून तीव्र आंदोलन करू, असे मीरा भाईंदर कामगार सेनेचे गोविंद परब, श्याम म्हाप्रळकर सरचिटणीस यांनी सांगितले.