ठाणे - इंधन दरवाढीचा परिणाम आता फटाक्यांना बसला आहे. फटाक्यांचे भाव प्रचंड वाढले आहेत. एकीकडे इंधन दरवाढ तर दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटीची भीती असल्यामुळे फटाक्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे फटाक्यांचा साठा कमी आणि मागणी जास्त असल्याचे दिसून येत आहे. या कारणाने फटाक्यांचे भाव जरी वाढले असले तरी मात्र फटाके खरेदीसाठी लोकांची गर्दी बाजारात पाहायला मिळत आहे.
फटाके घेण्यासाठी नागरिकांची गर्दी -
कोरोना काळात गेल्या वर्षी लॉकडाऊन आणि कोरोनाचे नियम कडक असल्याने नागरिकांना दिवाळी साजरीकरता आली नव्हती. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने थोड्या फार प्रमाणात कोरोना नियमामध्ये शिथिलता दिली गेली आहे. त्यातच गेल्या वर्षी फटाके फोडायला न मिळाल्याने या वर्षी नागरिकांची फटाके खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडालेली पाहायला मिळाली.
कोपरी फटाका मार्केट फुलला -
ठाण्यातील फटाक्यांसाठी प्रसिद्ध असलेले कोपरी येथे दरवर्षीच फटाके घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते. या वर्षीदेखील नागरिकांची फटाके घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु या वर्षी पेट्रोल दरात वाढ झाल्याने ह्याचा फटका फटाक्यांच्या भावावरदेखील बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 20 टक्के ने फटाक्यांच्या भावात वाढ झाली आहे. परंतु ही भाव वाढ झाली असली तरी नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात लाभत असल्याचे यावेळी फटाके विक्रेते यांनी सांगितले. यावर्षी झालेला मुसळधार पाऊस व कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने फटाके कंपन्यांनीदेखील यावेळी फटाके कमी उत्पादन केल्यामुळे फटाक्यांचा साठा कमी आणि मागणी जास्त असल्याचेदेखील फटाके विक्रेते यांनी सांगितले. तर इको फ्रेंडली म्हणजेच कमी प्रदूषण करणारे व कमी आवाज करणारे फटाक्यांची मागणी जास्त आहे, असे ही विक्रेते सांगत आहेत.
हेही वाचा - Diwali 2021 : आज लक्ष्मीपूजन! 'ही' आहे पुजेची योग्य वेळ, लक्ष्मी होईल प्रसन्न...