नवी मुंबई - गुंडागिरिला घाबरायचं नाही जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा मला रात्री अपरात्री कॉल करा. दुनियाभर फिरणारे इंटरनॅशनल डॉन आहेत. त्या सगळ्याना माहीत आहे. गणेश नाईक कोण आहे ते, असे वक्तव्ये नवी मुंबई तुर्भे येथे झालेल्या एका जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजप नेते गणेश नाईक यांनी केले आहे. सद्यस्थितीत नाईक यांची ही क्लिप सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंटरनॅशनल डाॅन बरोबर गणेश नाईक यांचे संबंध असतील तर त्याची एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे करणार आहेत. तसेच हा प्रश्न संसदेत उपस्थित करणार असल्याचे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सुळे यांनी सांगितले.
काय म्हणाले होते गणेश नाईक?
गुंडगिरीला घाबरायचं नाही. जेव्हा केव्हा लफडा (भांडण) होईल. तेव्हा मी येईन. इथले तर सोडाच पण इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, असे गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील तुर्भे येथे झालेल्या कार्यक्रमात म्हटले होते.
संसदेत प्रश्न उपस्थित करणार-
याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहेत. गणेश नाईक यांनी इंटरनॅशनल डॉन संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत आगामी लोकसभा अधिवेशनात म्हणणे मांडणार असल्याचे सुळे म्हणाल्या. नवी मुंबईतील महिला असुरक्षित असून, या विरोधात आंदोलन करा, असेही सुळे यांनी म्हटले. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन पाठवून चौकशी लावा, असे सुप्रिया सुळे यांनी महिलांना आवाहन केले आहे.