ठाणे - घरात घुसून माय लेकीला बेदम मारहाण करून घरातील ऐवज लुटून अज्ञात चोरटे फरार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण नजिक आटाळी गावात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. माय लेकीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून खडकपाडा पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
हेही वाचा - Eknath Shinde Poster as CM : एकनाथ शिंदेंच्या फोननंतर पोस्टरवरील 'भावी मुख्यमंत्री' शब्द हटवले
माघी गणपतीसाठी आली होती विवाहित मुलगी
कल्याण डोंबिवलीत घरफोडी, वाहन चोरी, चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली आहे. पोलीस अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांच्याकडून चोरीस गेलेले साहित्य हस्तगत केलेले आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटना सुरूच आहेत. त्यातच आटाळी मानी या गावात राहणाऱ्या वत्सला यांची विवाहित मुलगी सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत वत्सला यांच्या घरी माघी गणपतीला आली होती. काल रात्री गणेश विसर्जनानांतर आई आणि मुलगी, दोन मुलांसह घरी झोपल्या होत्या.
13 तोळे दागिनेसह रोकड घेऊन चोरटे पसार
मध्यरात्रीच्या सुमारास आईला जाग आली तेव्हा तिने पाहिले की, दोन चोरटे घरात शिरले आहेत. तिने आरडाओरड सुरू करण्याआधीच तिच्या डोक्यावर चोरट्यांनी मारहाण केली. या आवाजाने मुलगी सारिकाही जागी झाली. सारिकाने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी या दोघींना मारहाण केली व ते घरातील 13 तोळे दागिने आणि काही रोकड घेऊन पसार झाले. खडकपाडा पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
पोलीस तपास सुरू
खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खडकपाडा पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे. मात्र, घरात घुसून दोन महिलांना जखमी करून लुटमारीच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - Banners of Eknath Shinde as CM : भावी मुख्यमंत्री म्हणून ठाण्यात लागले एकनाथ शिंदेंचे बॅनर्स