ठाणे - कौटुंबिक भांडणाला कंटाळून पतीने पत्नीची हत्या करून गळफास लावत आत्महत्या केली. ही घटना ठाण्याच्या श्रीनगर वागले इस्टेट परिसरात घडली. आकाश बालाजी समुखराव व अश्विनी आकाश समुखराव अशी मृतांची नावे आहेत.
हत्या आणि आत्महत्या अशा दुहेरी घटना ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते १७ फेब्रुवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. या प्रकरणी बालाजी कडप्पा समुखराव(४८) रा. इंदिरानगर, वागळे इस्टेट ठाणे यांनी श्रीनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. आत्महत्या करणारा पती आकाश बालाजी समुखराव (२९) याने पत्नी अश्विनी आकाश समुखराव(१८) हिची हत्या प्रथम केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.
हेही वाचा-नाशिक; अखेर.. अपहरण झालेली चिमुकली सापडली!
अश्विनी आणि आरोपी आकाश हे रणजित पांडुरंग शिरसाठ यांची खोली, शिवमहिमा चाळ, रूपदेवी पाडा, छत्रपती मैदानाच्या बाजूला इंदिरानगर वागळे ठाणे या ठिकाणी राहत होते. वेगळे राहण्यावरून पती-पत्नीत सातत्याने भांडणे होत होती. दरम्यान या भांडणाला कंटाळलेल्या आरोपीने रागाच्या भरात हातोड्याने पत्नी अश्विनीच्या डोक्यात प्रहार केला. यात अश्विनीचा मृत्यू झाला. त्यानंतर पश्चातापात आरोपी पती आकाश याने राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती १७ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आरोपीचे वडील बालाजी यांनी श्रीनगर पोलिसांना माहिती दिली. खून व आत्महत्येच्या घटनेमुळे वागले परिसरात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा-धक्कादायक ! १३ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपायुक्त परिमंडळ-५, सहाय्यक पोलीस आयुक्त वागळे इस्टेट, विभाग ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. ए. शिंदे, पोलीस निरीक्षक प्रशासन छंदांकर, पोलीस निरीक्षक गुन्हे शिंदे यांनी भेट दिली. श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी पती आकाश याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. श्रीनगर पोलीस हे अधिक तपास करीत आहेत.