ठाणे - कर्नाटकात मुस्लीम विद्यार्थिनींनी हिजाब घातला म्हणून त्यांना कॉलेजप्रवेश नाकारण्यात आला. श्रीराम सेनेने हिजाब विरोधात आंदोलन पुकारले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी मुंब्रा रेतीबंदर येथे सामाजिक कार्यकर्त्या ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो हिंदू - मुस्लीम महिला रस्त्यावर उतरल्या. यावेळी मुस्लीम महिलांनी जय श्रीरामसह अल्लाह हू अकबरचे नारे देत भारतातील सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडविले.
हेही वाचा - Cluster Development Project : ठाणेकरांना हक्काचे घर देणार -एकनाथ शिंदे
कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथे सरकारी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हिजाब घालून प्रवेश करणार्या विद्यार्थिनींना बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने जारी केलेल्या ड्रेसकोडच्या नियमांना अनुसरून हिजाब घालणार्या विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येणार नाही, असे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तसेच, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा - मुंब्रा येथील शेकडो हिंदू - मुस्लीम महिलांनी निदर्शने केली. यावेळी महिलांनी ‘हिजाब हमारा अलंकार है; कर्नाटक सरकार होश मे आवो; जय श्री राम, अल्लाह हू अकबर; श्रीराम के नाम पर, मत बाँटो इन्सान को, अशा घोषणा दिल्या.
ऋता आव्हाड यांनी ड्रेस कोड लागू करणार्या कर्नाटक सरकारवर जोरदार टीका केली. ऋता आव्हाड यांनी सांगितले की, हिजाब हा मुस्लीम धर्माचा पेहराव आहे. अनेक वर्षांपासून या महाविद्यालयातील विद्यार्थिनी हा पेहराव वापरत आहेत. मात्र, श्रीराम सेनेला केवळ हिजाबबद्दलच नाही तर, जिन्स - स्कर्ट, टीशर्टबद्दलही आक्षेप आहे. या देशात सामाजिक असमानता निर्माण करण्याचा प्रयत्न श्रीराम सेनेने सुरू केला आहे.
निवडणुकांच्या पूर्वीचे हे राजकारण
संविधानाने सर्व धर्मियांना आपला धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. तर, या धर्माच्या ठेकेदारांना त्रास का होत आहे. केवळ निवडणुकांच्या तोंडावर धर्माचे कार्ड खेळले जात आहे. दुर्देवाने देशातील सर्वच धर्मांमध्ये असे प्रकार होत आहे. पण, आपले असे म्हणणे आहे की, कोणत्याही मुस्लीम धर्मियाने आणि हिंदूधर्मियाने एकमेकांना वैयक्तीक त्रास दिलेला नाही. मात्र, धार्मिकतेचे राजकारण केले जात आहे. मात्र, इस्लाम धर्मातील पूर्वापार परंपरांना धक्का लावण्याचा प्रयत्न काही धर्मांधांकडून सुरू आहे. त्याचा निषेध आम्ही करीत आहोत. श्रीराम सेनेकडून जे कृत्य केले जात आहे त्यास हिंदूधर्म कधीच मान्यता देत नाही, असेही आव्हाड म्हणाल्या.
हेही वाचा - पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण; मारहाण करणाऱ्या तरुण तरुणीला बेड्या