ठाणे - मुंबई नंतर आता ठाण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, कोपरी, आनंदनगर, किसननगर या भागात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील ४८ तासात मुंबईसह ठाणे, पालघर व तळ कोकणात मुसळधार पडण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसापासून ठाण्यात पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे वातावरणात उकाडा काही प्रमाणात वाढला होता. मात्र, आता पाऊस पुन्हा सक्रिय होत असून वातावरणात गारवा वाढला आहे. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सध्या ठाणेकर घरात बसून लॉकडाऊन आणि पावसाचा आनंद घेत आहेत.
आठवड्याभरापासून मुंबई आणि ठाण्यात पावसाने उघडीप दिली होती. आता मुंबई आणि परिसरात पुन्हा पाऊस सक्रिय होत आहे. मुंबईत दोन दिवस (3 आणि 4 जुलै) मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नागरिकांना दोन दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.