पनवेल - गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर शनिवारी रात्रीही पावसाने दमदार ‘बॅटिंग’ करून पनवेलकरांची तारांबळ उडवली आहे. पनवेल-सायन महामार्गावर कामोठे, कोपरा गाव, कळंबोली कॉलनी बसथांब्याजवळ दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबले आहे. त्यामुळे, आधीच खड्ड्यांचं साम्राज्य असलेल्या सायन पनवेल महामार्गावर अक्षरशः नद्या वाहू लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
कळंबोली वसाहतीबरोबरच पनवेल-सायन महामार्गावर पाणीच पाणी झाले. कळंबोली सब-वे आणि कोपरा टोलनाक्यात पाणी शिरले आहे. त्याचबरोबर स्टील मार्केट परिसरात दोन ते तीन फूट पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
खांदेश्वर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी असलेल्या दोन भुयारी मार्गांपैकी एका भुयारी मार्गात पाणी साचले आहे. या भागातील टेकड्यांवरून येणारे पाणी यापूर्वी येथील खाडीत जात होते. मात्र, आता पाण्याचे अनेक प्रवाह बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी जाण्यासाठी रस्ताच राहिलेला नसल्यामुळे आता गावागावात पाणी शिरू लागले आहे. पारगाव, डुंगी, ओवळा आणि गणेशपुरी या गावांमध्ये भरतीच्या वेळेला पाणी शिरले आहे. कोंबजभुजे गावातही खालच्या बाजूला पाणी साचले आहे.