ठाणे - बिहारच्या विधानसभा निवडणुकीबाबत तेथील मतदारांची १५ वर्ष राज्य करणाऱ्या सरकारबाबत नाराजी असल्याचे आजच्या निकालावरून लक्षात येत आहे. मात्र लालुप्रसाद यादव कारागृहामध्ये असताना त्यांचा मुलगा तेजस्वी याने बिहारच्या निवडणुकीत एकाकी लढत दिली. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व मोठं आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हणत तेजस्वी यादव यांचे अभिनंदन केले.
आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे हे कल्याण - डोंबिवली शहर जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष पदाचा तिढा सोडविण्यासाठी आज कल्याणात आले होते. त्यावेळी त्यांनी बिहार निवडणुकीच्या सुरु असलेल्या मतमोजणीच्या निकालावरून तेजस्वी यादव यांचे कौतुक केले.
महाविकास आघाडीचं सरकार जरी असलं तरी राष्ट्रवादीचे बळ वाढले पाहिजे -
अंबरनाथ नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी स्वरबळावर राष्ट्रवादी लढविणार असल्याचे जाहीर केल्याच्या पत्रकाराच्या प्रश्नावर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले कि, राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडीचं सरकार जरी असलं तरी राष्ट्रवादीचे बळ वाढले पाहिजे. यामध्ये काही दुमत नाही. मात्र राष्ट्रवादीचे घर वाढण्यासाठी पक्षश्रेष्ठी याचा निर्णय घेतात. आज कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष पदाच्या निवडी बाबत कार्यकर्त्याचे मनोगत जाणून घेत, तसा अहवाल प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात येईल, त्यांनतर ते निर्णय घेऊन जिल्हा अध्यक्ष पदाचा तिढा सोडवतील असेही त्यांनी शेवटी सांगितले.