ठाणे - आर्थिक वाद व समलैंगिक संबधाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या समलिंगी मित्राने २५ वर्षीय मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगरच्या ४ नंबर परिसरात असलेल्या एसएचएम महाविद्यालयासमोर असलेल्या बंद दुकानात घडली आहे. पवन आच्छरा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दिपक गोखलानी असे हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पवन आच्छरा हा १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजल्याच्या सुमारास बाहेरून जेवण करून येतो, असे वडिलांना सांगून घराबाहेर पडला. मात्र, तो नंतर घरी परत आलाच नाही. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार हिललाईन पोलीस ठाण्यात दिली होती.
१६ नोव्हेंबरपासून होता बेपत्ता, तर मोबाईल लोकेशनमुळे आरोपीचा लागला शोध
पोलिसांनी बेपत्ता झालेल्या पवनच्या मोबाईल लोकेशन व मोबाईलमधील सीडीआर तपासले असता सर्वाधिक झालेले कॉल व शेवटचा कॉल आरोपी दीपक गोखलनी याला केला होता. पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावल्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी दिपकनेच त्याच्या दुकानात पवनची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणगे यांनी तक्रार दाखल करून दीपकवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
समलैंगिक व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मृत तरुणाकडून आरोपीने उकळले लाखो रुपये-
आरोपी दिपकने मृतक पवनकडून उसने पैसे घेतले. त्याशिवाय समलिंगी अनैसर्गिक कृत्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊनही आणखी पैशांची मागणी पवनकडे केली. यालाच घाबरून पवनने घरातील काही दागिने व रोकडही आरोपीला दिली होती. मात्र पवनच्या कुटुंबाला रोकडसह दागिने नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पवनकडे विचारणा केली. त्यामुळे मृतक पवन याने आरोपी दीपककडे पैसे परत मागण्याचा तगादा लावला होता. यातूनच दीपकने पवनचा काटा काढण्याचे ठरवून त्याला बहाण्याने ४ नंबर परिसरात असलेल्या दुकानात १६ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास बोलाविले. बंद दुकानात त्याच्या गळ्याभोवती कपडा आवळून हत्या केली.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची केली होती तयारी
खळबळजनक बाब म्हणजे पवनची हत्या करण्याच्या रात्री आरोपी दिपकने नातेवाईकाची कार आणली होती. याच कारच्या डिक्कीमध्ये पवनचा मृतदेह लपवून ठेवत ही कार दुकानासमोर असलेल्या एसएचएम महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या कचराकुंडीजवळ आणून उभी केली होती. मात्र, हत्येचा उलगडा झाल्याने आज सकाळच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्या कारच्या डिक्कीमधून पवनचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रवाना केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सावंत करीत आहेत.